नागपूर : प्रतिनिधी
राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मुसळधार पाऊस पडला की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होवून जनजीवन विस्कळीत होण्याची घटना घडते. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यातील दुरावस्थेला मुंबई महापालिकेच्या अर्थात शिवसेनेला दोषी ठरविण्याचा प्रयत्न सर्व पक्षियांकडून केला जातो. मात्र यंदा पहिल्यादाच मुसळधार पावसाने नागपूरातील जनजीवनावर परिणाम झाल्याने भाजपच्या मंत्र्यांना परिस्थितीवर सारवासारव करणे अडचणीचे गेले.
एरव्ही ऊठसूट मुंबईवर टीका करणार्यांची बोलती आज नागपूरचे तुंबापूर झालेले पाहिल्यानंतर मात्र बंद झाली. खुद्द भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्याकडे प्रतिक्रिया मागण्यासाठी पत्रकार गेले असता मी नंतर बोलेन एवढेच सांगत तेथून काढता पाय घेतला. तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पाऊस हा शेतकर्याला हवा असतो. या पावसामुळे जर कुणाच्या मनात काळंबेरं येत असेल तर तो शेतकरीपुत्र नाही, असे म्हणत वेळ मारून नेली.
लाइट गेली नाही तर बंद केली – चंद्रकांत पाटील
पावसामुळे नागपुर तुंबले आहे यावर पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, त्यांनी अपेक्षीतपणे आलेल्या पावसामुळे विधानभवनात बाहेरचे पाणी घुसले, चेंबरमध्ये बाटल्या, कँरीबँग अडकल्याने पाणी तुंबले. चेंबर साफ केल्यानंतर पाणी गेले. पाणी तुंबल्याने दुर्घटना होऊ नये म्हणुन लाईट बंद केली होती. लाईट गेली नव्हते असे सांगितले. यानंतर पावसामुळे नागपुर तुंबले आहे यावर पुन्हा विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी तेथून निघुन जात उत्तर देण्याचे टाळले.
नागपूर महापालिकेच्या कारभाराची चौकशी करा; शिवसेनेची मागणी
नागपूरमध्ये आज पहाटेपासून पडणार्या पावसात शहरातील रस्त्यांवर प्रचंड पाणी तुंबले आहे. रवी भवन तसेच इतर ठिकाणी मंत्र्यांचे बंगले व आजूबाजूला पाणी साचले आहे. मुंबईत अशाच पद्धतीचे पाणी साचले असते तर मुंबई महानगर पालिकेवर आक्षेप घेतले असते. तेथील पालिकेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली असती. महापालिकेच्या कार्यक्षमतेवर शंका घेतली गेली असती. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे. पावसाळी अधिवेशनात नागपूर शहराची परिस्थिती पूरमय झाली आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेची चौकशी राज्य सरकारने करावी. या ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा काम करते का, लोकांना दिलासा मिळणार आहे का, हा प्रश्न आहे. त्यामुळे याची देखील चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली. यावेळी शिवसेनेच्या सर्व आमदारांनी नागपूर महापालिकेच्या कारभाराची चौकशी करा अशा जोरदार घोषणा दिल्या.
दारूच्या बाटल्यांची चौकशी करा – प्रताप सरनाईक
विधिमंडळ हे लोकशाहीतील पवित्र मंदिर आहे. या मंदिरात दारुच्या व बियरच्या बाटल्या कशा आल्या याची चौकशी करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. ते पुढे म्हणाले की, विधानभवनाच्या परिसरात तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारांची साफसफाई सुरू केली तेव्हा गटारात दारूच्या बाटल्या सापडल्या. विधिमंडळ हे पवित्र स्थान आहे. आमच्यासाठी हे मंदिर आहे. या मंदिरात शिरत असताना आधी आम्ही त्याच्यापुढे नतमस्तक होतो आणि मगच सभागृहात प्रवेश करतो. अशा पवित्र वास्तूत जर दारूच्या व बिअरच्या बाटल्या सापडत असतील तर अतिशय दुर्दैव आहे. दारुच्या बाटल्या विधानभवनाच्या आवारात कशा आल्या याच्या सखोल चौकशीची आम्ही मागणी केली आहे. आमदारांच्या स्वीय सहाय्यकांनाही विधिमंडळाच्या परिसरात येण्यास मज्जाव केला जातो. या परिसरात एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असताना मग आतमध्ये दारुच्या बाटल्या कशा येतात, याची चौकशी होणे गरजेचे आहे. दारूच्या बाटल्या आतमध्ये आणणार्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे असे प्रताप सरनाईक म्हणाले.
बाटल्यांचा लाभार्थी कोण ?
विधिमंडळाच्या परिसरातील गटारात दारुच्या बाटल्या सापडण्याच्या घटनेचा काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनीही निषेध केला आहे. होय हे माझे सरकार..मी लाभार्थी… अशी जाहिरात भाजपचे सरकार करते तर मग या दारूच्या बाटल्यांचा लाभार्थी कोण होता याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. मूळात नागपूरमध्ये अधिवेशन घेण्याची गरजच नव्हती. एका पावसात नागपूरची ही अवस्था झाली. पावसाळ्याचा सामना करण्याची भाजपप्रणीत स्थानिक महापालिकेची तयारी नव्हती तर मग नागपूरमध्ये अधिवेशन घेण्याचा अट्टाहास मुख्यमंत्र्यांनी का केला, असा सवाल काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी यावेळी केला.
सरकार शुद्धीवर का नाही,
याचे कारण आता उमगले! – विखे पाटील
विधानभवनातील गटारात दारूच्या बाटल्या सापडल्याच्या घटनेवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोचक टीका केली असून हे सरकार मागील चार वर्षांपासून शुद्धीवर का नाही, याचे कारण आता उमगले आहे. या सरकारकडे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ नाही. उलटपक्षी त्यांचे ‘मॅनेजमेंट’च एक ‘डिझास्टर’ आहे. म्हणूनच पाऊस आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे विधीमंडळाचे कामकाज बंद करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. भाजप-शिवसेना सरकारने महाराष्ट्राला अगोदरच अंधारात ढकलले आहे. आज विधिमंडळालाही अंधारात ढकलले. राज्याला तर अगोदरच बुडवले आहे. आता विधानभवनही बुडते की काय, अशी गंभीर परिस्थिती या सरकारने निर्माण करून ठेवल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
पावसाळी अधिवेशन घेऊन सरकारचं नियोजन फसलं – धनंजय मुंडे
साडेतीन वर्षात सरकारचं नियोजन जसं पूर्णपणे फसलं आहे तसंच पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेऊन हे सरकार फसलं आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. पावसाळी अधिवेशन यापूर्वी कधी नागपूरमध्ये झाले नव्हते. आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की, पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेऊ नका. पाऊस जर मोठा पडला तर नागपूरमध्ये राहण्याच्या व्यवस्थेपासून ते विधिमंडळाच्या कामकाजापर्यंत परिणाम होईल आणि आज तो दिवस आला. याचसाठी केला होता अट्टाहास असंच आता म्हणावे लागेल असेही मुंडे म्हणाले.
बालहट्टपायी अधिवेशनाचा निर्णय – अजित पवार
या सरकारला कुठल्याच गोष्टीचं गांर्भिय आणि स्वारस्य राहिलेले नाही. अक्षरश: पोरखेळ चालला आहे त्यामुळे आजचा दिवस वाया गेलेला आहे. या सरकारमध्ये असलेल्यांनी याची भरपाई दिली पाहिजे. या सरकारने तुमच्या-माझ्या राज्याला चार लाख कोटी कर्जाच्या खाईत लोटले आहे. असे असतानाही हे किती बेपर्वाईने काम चालते याचं मूर्तीमंत उदाहारण आज पहायला मिळाले. लाखो रुपये खर्च कुणाचे होतात. विधीमंडळाच्या परिसरामध्ये,आवारामध्ये जो काही पाऊस पडला त्याचं पाणी ड्रेनेजच्या माध्यमातून, गटाराच्या माध्यमातून नीटपणे जायला हवं होतं. गटारे का साफ केली नाही? हे सरकार झोपा काढतंय का?असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला. या अधिवेशनाची यांची तयारी नव्हती. नेहमी हिवाळी अधिवेशन नागपूरला घेत होतो. फार तर दोन आठवड्याऐवजी तीन आठवडे , चार आठवडे करा. आमची बसायची तयारी आहे. १ तारखेला अधिवेशन सुरु करा आणि २४ तारखेला संपवा ना. चार आठवडे जरी अधिवेशन झाले तरी कामकाज व्यवस्थित होवू शकते. परंतु कुणाच्या तरी बालहट्टापायी अशा प्रकारचा निर्णय घेतला असा आरोपही पवार यांनी केला.
नागपूरची दाणादाण
शाळा, रुग्णालयांत पाणी शिरलं
विदर्भातील बहुतांश जिल्हांमध्ये पहाटेपासून विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. नागपूर शहरात या पाऊसामुळे रस्तांवर पाणी साचल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. अनेक सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे तर सिमेंट रोड आणि मेट्रोच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्यांमध्ये पाणी भरल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. विमानतळाजवळील तसेच वर्धा मार्ग आणि रिंग रोडवरील रस्त्यांवरील साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक चांगलीच विस्कळीत झाली. त्याचप्रमाणे रस्त्यावरील पाणी शाळा, कॉलेजेस तसेच रुग्णालयांतही शिरले. यामुळे नागपूरची पूर्णत: दाणादाण उडाली.
शहरातील अनेक भागांमध्ये पाणी तुंबले यात प्रतापनगर, सोमलवाडा, चंदननगर, नेहरूनगर, कबीरनगर, रामदासपेठेतील सेंट्रल मॉल या परिसरांचा प्रामुख्याने समावेश आहे. हवामान खात्यातर्फे विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. तरीसुद्धा प्रशासनाने काहीही न केल्याने पाणी तुंबल्याची सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे. ठिकाणी सिमेंट रस्त्यांची उंची जास्त असल्याने पाणी थेट बाजुच्या वस्त्यांमधील घरांमध्ये शिरले. यात काचीपुरा, अंबाझरी, पांढराबोडी, कळमना या परिसरांचा समावेश आहे. तसेच रिंग रोडवरील काही भागात तर रस्त्यांवर पाणी साचल्याने काही काळासाठी वाहतूक बंदच होती. यात प्रामुख्याने छत्रपती चौक ते ऑरेंज सिटी चौक या मार्गाचा समावेश आहे. या मार्गावरील एका बाजुला सध्या सिमेंटच्या रस्त्याचे काम सुरु असल्याने चांगलेच पाणी साचले होते. तसेच शंकरनगर चौकातील वाहतुकसुद्धा काही काळासाठी बंद झाली.
Marathi e-Batmya