Breaking News

नाना पटोले यांची टीका, मोदी-शाहसाठी महाराष्ट्र म्हणजे एटीएम महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा षण्मुखानंद सभागृहात संपन्न

भारतीय जनता पक्षाकडे भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा आहे. दिल्लीत बसलेले दोन नेते महाराष्ट्राला एटीएम समजून लुटत आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपा युतीचा पराभव करून मोदी-शाहांचे हे एटीएम बंद करू आणि महाराष्ट्राचा पैसा महाराष्ट्रातील जनतेसाठीच वापरू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा षण्मुखानंद सभागृहात संपन्न झाला, या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अस्लम शेख, शिवसेना खा. संजय राऊत, खा. सुप्रिया सुळे, शेकापचे जयंत पाटील, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेत्याला महत्वाचे स्थान आहे, सत्तापक्ष व विरोधीपक्ष ही लोकशाहीची दोन चाके आहेत पण स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना योग्य स्थान दिले नाही, हा लोकशाहीचा खून आहे. भाजपामध्ये सत्तेची घमेंड व गर्व अजून आहे, विधानसभेच्या निवडणुकीत ही अहंकारी प्रवृत्ती सत्तेतून बाहेर काढली पाहिजे असे मतही यावेळी व्यक्त केले.

काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या १० वर्षांच्या मनमानीला जनतेने उत्तर दिलेले आहे. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत वाढला आहे, महाराष्ट्राने संसदेत वाघिणी पाठवल्या आहेत, या महिल्या खासदार भाजपा सरकारला धारेवर धरत आहेत. लोकसभेतील राहुल गांधी यांच्या पहिल्याच भाषणाने ५६ इंचाच्या छातीला धडकी भरली. लोकसभा निवडणुकीत बहुमत जाताच नरेंद्र मोदी यांना धर्मनिरिपेक्षतेची आठवण झाली आहे. लोकसभेच्या विजयाने महाराष्ट्रात चैतन्याचे वातावरण आहे, राज्यातील बेकायदेशीर सरकार घरी बसवण्याची जनतेची भावना आहे. ‘पन्नास खोके, एकदम ओके’ हे जनता अजून विसरलेली नाही. महायुती सरकारचे घोटाळे उघड करताना महाविकास आघाडी सरकारने पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली हे सांगा. मविआच्या चांगल्या कामांची माहिती जनतेला सांगा, असे आवाहनही यावेळी कार्यकर्त्यांना केले.

प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यावेळी म्हणाले की, महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. दर वाढवून टेंडर द्यायचे व त्यातून टक्केवारी घेऊन लुट सुरु आहे. मुंबईत आता कुकर घोटाळा सुरु झाला आहे, ६०० रुपयांचे कुकर अडीच हजार रुपयांना विकत घेऊन प्रत्येक वार्डात ४० ते ५० हजार कुकर वाटले जात आहेत. भाजपाने वफ्क बोर्डाच्या जमिनीचा मुद्दा पुढे आणला आहे, परंतु हिंदू धर्माच्या देवस्थानची जमीन असो वा मुस्लीम धर्माच्या देवस्थानच्या जमिनींना हात लावाल तर ते सहन केले जाणार नाही, असा इशाराही यावेळी दिला.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेची सध्या चर्चा सुरु आहे, पण महिलांसाठी महालक्ष्मी योजना ही सर्वात आधी कर्नाटक व तेलंगणात काँग्रेस सरकारने आणली आहे. महायुती सरकार बहिणींना नाही तर मतांसाठी पैसे देत आहे पण हे पैसे परत घेण्याची धमकीही देत आहेत. लाडकी बहीण तर आता आली लाडका मित्र योजना तर अडीच वर्षांपासून सुरु आहे. मुंबईतील सर्व महत्वाच्या जागा या लाडक्या मित्राला दिल्या जात आहेत. मविआची सत्ता आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या दोन वर्षांच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढू असे आश्वासनही यावेळी दिले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *