नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने हातात घेतली असून काँग्रेस व इंडिया आघाडीच्या उमेदवारांना जनतेचा आशिर्वाद मिळाला आहे. विरोधी पक्षांच्या उमेदवाराला लोकांनी अनेक गावातून हाकलून लावले. १० वर्षातील अत्याचारी कारभाराला जनता कंटाळली आहे. मोदी सरकारविरोधात जनतेमध्ये तीव्र संताप असून विदर्भातील पाचही जागांवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा विजय होईल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

भंडाऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, केंद्रातील तानाशाही सरकारने १० वर्षात देशाची संपत्ती विकून देश चालवला, देश कर्जबाजारी करून ठेवला, तरुणांचे जीवन बरबाद केले, शेतकऱ्यांना उद्धवस्त केले, महागाई, बेरोजगारी या ज्वलंत विषयावर भाजपाचे नेते बोलतच नाहीत, हा राग जनतेच्या मनात आहे. मोदी सरकारचा कारभार पाहून जनतेने त्यांचा निर्णय पक्का केला असून परिवर्तन होणार असे चित्र विदर्भातील पाचही मतदारसंघात दिसले. काँग्रेस पक्षाने जाहीर सभा, चौक सभा घेण्याबरोबरच घरोघरी जाऊन ५ न्याय व २५ गॅरंटीची माहिती लोकांपर्यंत पोहचवली. काँग्रेस पक्षाने दिलेली गॅरंटी जनतेचे कल्याण करणारी आहे तर मोदी गॅरंटी ही भ्रष्टाचारी लोकांना वाचवणारी आहे. भ्रष्ट लोकांना ईडी, सीबीआयकडून दबाव आणून भाजपात प्रवेश द्यायचा व वॉशिंगमधून त्यांना स्वच्छ करण्याचे काम भाजपाने केले आहे.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपाच्या उमेदवारांनी आचारसंहितेचा भंग केला, खर्चाची मर्यादाही ओलांडली असून त्यासंदर्भात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने मतविभाजनाचा प्रयत्न केला असला तरी त्यात त्यांना यश येणार नाही. काँग्रेस व गांधी, नेहरु परिवारावर आरोप करून भाजपा सत्तेत आले परंतु १० वर्षात भाजपाने काय केले यावर ते बोलत नाहीत. नेहरु, गांधी परिवारावर टीका करुन भाजपा पापे लपवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ शेवटची तीन महिन्यांची मुदतवाढ

२०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *