औरंगाबादेतील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे कोणाला लक्ष्य करणार काय बोलणार याबाबतची उस्तुकता राजकिय वर्तुळात निर्माण झाली होती. मात्र राज ठाकरे यांनी या सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेनेवर एका चकार शब्दाने न बोलता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. तसेच महाराष्ट्रातील जाती-पातींमध्ये द्वेषाचे राजकारण सुरु केल्याचा आरोप केला. राज ठाकरे यांच्या या टीकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राच्या हितासाठी काही जणांच्या भाषणाकडे कानाडोळा करणे हेच महत्वाचे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
राज ठाकरेंनी शिक्षणाचा, आरोग्याचा, रोजगाराचा, सामाजिक व धार्मिक एकात्मतेचा अल्टिमेटम दिला असता तर आम्ही सर्वांनी त्यांचे स्वागत केले असते. परंतु भारतीय जनता पार्टीने दिलेली स्क्रिप्ट हीच गिरवायची आता एवढच काम राज ठाकरे यांना राहिलेले असल्याचा टोलाही राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला.
स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कुठल्याच प्रकारचा नवीन सामाजिक व राजकीय विचार राज ठाकरे देऊ शकले नाहीत. म्हणूनच आतापर्यंत राजकारणात त्यांचा पक्ष अपयशी ठरलेला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
पवार साहेबां सारख्या कृतीशील नेत्यावर टीका-टिप्पणी केल्याशिवाय आपल्याला प्रसिद्धी मिळत नाही आणि म्हणूनच त्यांच्यावर काही नेते बोलतात. शरद पवार साहेबांच्या नखा इतकी उंची जर राज ठाकरेंची असती तर नक्कीच ते एक कर्तुत्ववान नेते म्हणून राज्यामध्ये वावरले असते असा खोचक टोलाही त्यांनी लागवला.
महाराष्ट्रात जातीय व धार्मिक एकात्मता राखण्यासाठी महाविकासआघाडी सक्षम आहे आणि म्हणूनच काही लोकांच्या भाषणाकडे कानाडोळा करणे हेच महाराष्ट्राच्या हिताचे असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान राज ठाकरे यांनी शरद पवारांनी प्रबोधनकारांचे माझी जन्मगाथा हे पुस्तक वाचावे असा सल्ला देत त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या विरोधात हिंदू मिशनरी चळवळ सुरु करण्यासंदर्भात लिहीले होते. तसेच त्यांचे लिखाण हे धर्मातील अनिष्ट प्रथांवर कोरडे ओढणारे होते. त्यामुळे त्यांनी समग्र प्रबोधनकार वाचावे असा सल्ला देत परंतु पवारांनी फक्त आपल्याला सोयीचे आहे तेच वाचले अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
Marathi e-Batmya