पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश लोक उगवत्या सुर्याला नमस्कार करतात पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला: हर्षवर्धन सपकाळ

पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यानीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रशांत जगताप यांना अनेक पक्षांचे आमंत्रण असतानाही त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करणे पसंद केले. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश हा काँग्रेसला बळ देणारा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जगताप व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवनमध्ये झालेल्या कार्यक्रर्माला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मंत्री नसीम खान, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, आमदार हेमंत ओगले, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस भाऊसाहबे आजबे, धनंजय शिंदे, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा व काँग्रेस पक्ष या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. राजकीय पक्ष हे विचारधारेवर काम करत असतात आणि काँग्रेस पक्ष ही वैचारिक लढाई निष्ठेने व निकराने लढत आहे. पण आज काही पक्ष हे केवळ सत्ता व सत्तेतून भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवणे व त्या पैशातून निवडणुका जिंकणे हे काम करत आहेत. पैसा फेक व तमाशा देख हे वगनाट्य जोरात सुरु आहे. काँग्रेसची विचारधारा देशाला तारणारी आहे आणि प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेसच्या प्रशांत महासागरात प्रवेश केला आहे, त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत आहे.

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस पक्षाला विचारांचा वारसा आहे, समता, बंधुता, सामाजिक न्याय या मुल्यांसाठी काँग्रेसचा लढा आहे. तर दुसरीकडे जातीवादी मनुवादी विचाराचा भाजपा पक्ष आहे. भाजपाची भूमिका ही केवळ मूठभर लोकांच्या हाती राजसत्ता व धर्मसत्ता असावी अशी आहे. काही लोकांना काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री, मंत्री आमदार खासदार सर्व पदे दिली पण त्यांची घुसमट होते म्हणून ते काँग्रेस पक्ष सोडून गेले. लोक उगवत्या सुर्याला नमस्कार करतात पण जगताप आणि वैचारिक लढ्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, प्रशांत जगताप हे राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) यांच्या बरोबर काम करत होते. प्रशांत जगताप यांनी जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही ठाम भूमिका घेतली व काँग्रेस पक्षात प्रवेश केला, विचारांशी बांधिलकी अशी असली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर विचारांशी तोडजोड न करणारे ते नेते आहेत. त्यांना अनेकांनी ऑफर दिली, थांबावण्याचा प्रयत्न केला पण प्रशांत जगताप यांनी पुरोगामी शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार सोडला नाही असे नेते असतील तर २०२९ आपले असेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

माजी मंत्री नसीम खान म्हणाले की, आज देशासमोर लोकशाही, संविधान वाचवण्याची नितांत गरज आहे. शेतकरी, महिला, बरोजगारांचे प्रश्न आहेत, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत, पण कोणालाही न्याय मिळत नाही. या ज्वलंत प्रश्नावर काँग्रेस पक्ष लढा देत आहे. राज्यात व देशात जातीयवाद व भ्रष्टाचार वाढत चालला आहे. भाजपाने खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली. तोडा फोडा ही भाजपाची निती आहे, अशा वेळी देशाला केवळ काँग्रेस विचारच वाचवू शकतो.

प्रशांत जगताप यावेळी म्हणाले की, काँग्रेस पक्ष आहे १३५ वर्षांचा जुना पक्ष असून अथांग महासागर आहे कितीही वादळे आली तरी काँग्रेस पक्ष हिमालयासारखा खंबीरपणे उभा आहे. पुरोगामी विचाराचा मी कार्यकर्ता असून शिव शाहू फुले आंबेडकर, गांधी व नेहरु विचार पुढे घेऊन जाण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. माझी लढाई जातीवादी व भ्रष्टाचाराविरोधात आहे. आणि आज भाजपाला फक्त काँग्रेस पक्षच टक्कर देऊ शकतो असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार..

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ४१ नगराध्यक्ष विजयी झाले. या विजयी नगराध्यक्षांचा आज टिळक भवनमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला.

हर्षवर्धन सपकाळ शेवटी बोलताना म्हणाले की, “नगरपालिका निवडणुकीत १००६ नगरसेवक निवडून आले तर १०० नगरपालिकांमध्ये काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे.या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांनी पैशांचा वारेमाप वापर केला, पोलीसांचा वापर केला. निवडणूक आयोग त्यांच्या मदतीला होता. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना दमबाजी करण्यात आली, मारहाण करण्यात आली, खोटे गुन्हे दाखल करण्यात आले तरीही काँग्रेसचा कार्यकर्ता न डगमगता लढला व यश मिळवले, आज राज्यात काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे. ४१ ही संख्या फार मोठी नाही पण आजच्या विपरीत परिस्थितीत जे यश मिळवले आहे ते उल्लेखनीय आहे. जे विजयी झाले त्यांचे अभिनंदन आहेच पण जे पराभूत झाले त्यांचेही अभिनंदन आहे कारण त्यांनी निर्धाराने लढा दिला”, असेही यावेळी सांगितले.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी ‘काँग्रेस लढणार, महाराष्ट्र जिंकणार’, या टॅगलाईनचे व टिझरचे प्रकाशन करण्यात आले.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *