ही वेळ एकमेकांवर टीका करण्याची नाही; कारण आपण सगळे भारतीय एक आहोत. आज दहशतवादाविरोधात सुरू असलेली लढाई ही कोणतीही वैयक्तिक किंवा राजकीय लढाई नाही, तर ती आपल्या देशाच्या एकात्मतेसाठीची सामूहिक लढाई असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, भारतीय सैन्य दलाबाबत कोणताही गैरसमज निर्माण होईल, असा कुठलाही संदेश राजकीय पक्षांनी देऊ नये, यावर सर्वपक्षीय सहमती झाली आहे. आपण सर्वजण भारतासोबत आहोत. या मुद्द्यावर राजकारण होऊ नये, आणि होणारही नाही. सैन्याशी संबंधित कोणताही विषय हा अत्यंत संवेदनशील असल्याने विरोधी पक्षांनी देखील संयमाने आणि जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. सरकारवर टीका करताना आम्ही एक मर्यादा पाळतो, कारण आमचे उद्दिष्ट देशहित आणि लोकहीताचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही अतिशय वेदनादायक घटना आहे. हगवणे कुटुंब मुळशी आणि पुण्यातील मोठे नाव असलेले कुटुंब आहे. त्यांचे आजोबा पंचायत समितीमध्ये अनेक दशक चांगले काम केले आहे. आताच्या पिढीत काय झाले आहे हे अतिशय धक्कादायक आहे. मी पोलिसांकडून जी काही माहिती घेतली, एकूण जो रिपोर्ट पोलिस आणि मीडियाकडून आला आहे, त्याच्यातून ग्रे एरिया आला आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की आत्महत्या आहे तर काहींचे म्हणणे आहे की ही हत्या असल्याचे बोलले जात असल्याचे सांगण्यात येत असल्याचेही यावेळी सांगितले.
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, २४ वर्षांची मुलगी होती ती. या कुटुंबाने सहा दशक काँग्रेससोबत काम केले आहे. पण आता ही घटना ऐकून धक्का बसला आहे. अशा सुशिक्षित कुटुंबात हुंडाबळी होत असेल तर महाराष्ट्र कुठे चालला आहे आणि एक नाही दोन दोन सुनांवर, हा माझ्या मतदारसंघातला विषय आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी कार्यक्रम होता. मी त्या कार्यक्रमाला गेले नाही. कारण मला दाखवून द्यायचे होते की तुमच्या घरातल्या सुनेची डोमेस्टिक व्हायलन्सची तक्रार आहे. त्यांच्या सुना जर पोलिस ठाण्यात जात असतील आणि त्यांच्या केसेस चालू असतील म्हणून मी त्या कार्यक्रमात नाही गेले. या २४ वर्षांच्या मुलीला या पुरोगामी महाराष्ट्रात न्याय मिळालाच पाहिजे. त्यासाठी जी काही लढाई लढावी लागेल ती मी लढायला तयार आहे. महाराष्ट्राच्या या लेकीला न्याय मिळवून देणार असल्याचा निर्धारही यावेळी केला.
लाईव्ह |📍मुंबई | पत्रकारांशी संवाद | 🗓️21-05-2025 https://t.co/FKubxSNtb2
— Supriya Sule (@supriya_sule) May 21, 2025
हुंडाबळी बाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हा विषय अतिशय गंभीर आहे. या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली असून, आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी करत महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी राज्य सरकारने अधिक गंभीरपणे कार्यवाही करावी, असे आवाहनही यावेळी केले.
शेवटी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आजच्या एका इंग्रजी वर्तमान पत्रातील वृत्तानुसार, जलजीवन मिशनमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे किंवा कामांचे अधिक मूल्यनिर्धारण करण्यात आले आहे. सर्वच पक्षांच्या खासदारांचे म्हणणे आहे की, जलजीवन मिशन अंतर्गत अनेक राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये अनियमित व चुकीची कामे झालेली आहेत. त्यामुळे मी सी. आर. पाटील आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya