Breaking News

मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेवर मंत्री उदय सामंत यांचे आवाहन मराठा आरक्षण बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांना जरांगेनी जाब विचारावा

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा उपोषणाचे आंदोलन मागे घेत इथे सलाईन लावून मरण्यापेक्षा आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई लढून मरू असे सांगत मला तुरुंगात टाकण्याचा डाव देवेंद्र फडणवीस यांचा आहे. जर उद्या मला सरकारने तुरुंगात डांबले तर भाजपाची एकही सीट निवडून देऊ नका असे जाहिर आवाहन केले. त्यानंतर भाजपाच्या आमदार आणि शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून मनोज जरांगे यांना अशी भूमिका न घेता ज्यांनी मराठा-ओबीसी आरक्षणाच्या बैठकीला हजेरी लावली नाही त्यांना जाब विचारा असे आवाहन केले.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत राज्यातील महायुती सरकारने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र ज्यांनी आरक्षण दिलं नाही, ज्यांची मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट नाही. जे राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला येत नाहीत, त्यांना मनोज जरांगे पाटील यांनी जाब विचारणं आवश्यक आहे, असे आवाहन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज केले.

आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांचा उद्देश समाजासाठी आहे मात्र त्यांनी पूर्वग्रहदूषित टीका टिप्पणी करु नये, अशी अपेक्षाही यावेळी केली.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, जरांगे यांनी केलेल्या आंदोलनाबाबत दुमत नाही, त्यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजातील अनेकांना दाखले आणि नोंदी मिळाल्या आहेत. या आंदोलनाला सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे राज्य सरकारने मराठा समाजाचे सर्वेक्षण केले. अवघ्या १२ दिवसांमध्ये ३३७ कोटी रुपये खर्च करून १ कोटी ५८ लाख घरांचे सर्वेक्षण करण्यात आले, अशा प्रकारचे जगात पहिल्यांदाच इतक्या जलदगतीने व्यापक सर्वेक्षण झाले असेल, असे स्पष्ट केले.

पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले की, या सर्वेक्षणाच्या आधारे अहवाल आल्यानंतर राज्य सरकारकडून आरक्षणाची घोषणा करण्यात आली असे ते म्हणाले. जरांगे यांनी सरकारच्या या चांगल्या गोष्टींचा देखील विचार करायला हवा. आरक्षण देताना सरकारकडून मराठा किंवा ओबीसी कुणावरही अन्याय होणार नाही, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. अधिसंख्य पदे भरण्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी मविआ काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांना केली होती पण निर्णय झाला नाही, याकडे लक्ष वेधले.

शेवटी बोलताना उदय सामंत म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना जरांगे पाटील यांनी गैरसमज करून बोलू नये. फडणवीस मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहेत. देवेंद्रजी चुकीची भूमिका घेत असल्याचे म्हणणे गैर आहे. या आंदोलनाचा राजकीय वापर करणाऱ्यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही, यावर दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही यावेळी विरोधी पक्षांना दिले.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *