उद्धव ठाकरे यांचा सवाल, …पण सुनावणी नाही, तर बतावणी कधी होणार? लक्ष भरकटवण्यासाठी कुत्र्याचा प्रश्न, कबुतराचा प्रश्न

शिवसेना पक्ष फुटीनंतर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर अद्याप सर्वोच्च न्यायालयाने अंतिम सुनावणी घेत निर्णय दिलेला नाही. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार जाऊन आता पुन्हा नव्याने निवडणूका होत पुन्हा राज्यात महायुती सरकार स्थानापन्न झाले. तरीही शिवसेना पक्षफुटीवर अद्याप सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिला नाही. फक्त तारीख पे तारीख देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, घटनेत संविधानात परिशिष्ट १० आहे की नाही? पक्ष फूट समोर दिसत असूनही केवळ ‘तारीख पे तारीख’ सुनावणी सुरू आहे, पण बतावणी कधी होणार?  असा सवाल करतानाच, या प्रकरणांचा लवकरात लवकर निकाल देण्याची विनंती शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

घटनाविरोधी, जनविरोधी जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी जनसुरक्षा कायदाविरोधी संघर्ष समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण केंद्रात राज्यव्यापी परिषदेचे आयोजन आज करण्यात आले होते. त्या परिषदेत या कायद्याबद्दल आपली भूमिका मांडताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात रखडलेल्या निकालाचा उल्लेख केला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, दिल्लीतील भटक्या कुत्र्यांच्या मुद्यावर कार्यतत्पर सरन्यायाधीशांनी लगोलग आदेश दिले. मात्र आमचे पक्ष दिवसा ढवळ्या फोडले गेले त्यावर निकाल दिलेला नाही. न्यायालयाच्या उंबरठ्यावर तडफडणारी लोकशाही वाचली तर कुत्री मांजरं वाचतील, अशा उद्विग्न भावनाही यावेळी व्यक्त केल्या.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, देशात सध्या भयंकर परिस्थिती दिसतेय. देश गुलामगिरीकडे चाललाय आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली आहे. त्यामुळे हिंदुस्थानचे स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर संघर्ष करावा लागेल, हुकूमशाहीविरुध्द दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची गरज आहे, असे आवाहन करत त्यासाठी शिवसेना सदैव समविचारी पक्षांसोबत राहील, अशी ग्वाहीसुध्दा यावेळी दिली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या कायद्यात देशद्रोह या शब्दाचा उल्लेखच नाही. संविधानात डावे-उजवे असा भेदभाव नाही. फक्त धर्मनिरपेक्षता, समान वागणूक असा उल्लेख आहे. जनसुरक्षा कायदा हा देशद्रोहीविरोधी कायदा आहे असे सरळसरळ म्हणा, देशाविरुध्द कृती करणाऱ्याला फासावर लटकवू असे सरकार म्हणाले तर शिवसेनेचा या कायद्याला पूर्ण पाठिंबा असेल, डावे-उजवे करण्यापेक्षा जनसुरक्षा कायदा सर्वसामान्यांसाठी किती वाईट आहे किंवा त्या कायद्याचा दुरूपयोग सर्वसमान्यांविरुध् कसा केला जाऊ शकतो हे पटवून दिल्याशिवाय जनसामान्यांमधून या कायद्याविरुध्द उठाव होणार नाही, असेही यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपावरही हल्ला चढवताना म्हणाले की, भाजपाची मानसिकता सडलेली आहे आणि शिवसेना सडलेल्या मानसिकतेविरोधात आहे, असे सांगत, शिवसेनेने भाजपासोबत २५-३० वर्षे वाया घालवली, अशी उद्विग्नता व्यक्त करत राजकारणात मनभिन्नता असू शकते. शिवसेनेचा डाव्या पक्षांबरोबरही पराकोटीचा संघर्ष झाला आहे. पण नंतर कळले की उगीचच भांडत होतो. आता एकत्र येतोय कारण आमच्यामध्ये देशप्रेम हा धागा असल्याचेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपा आयत्या बिळावरचा नागोबा आहे आणि लोकांकडून दूध पाजण्याची अपेक्षा ठेवतो. भाजपाने देशाला कोणतेही विचार किंवा आदर्श दिले नाहीत, म्हणून दुसऱ्यांचे आदर्श चोरतात, असा टोला लगावत काहीही वाईट झाले की पंडित नेहरूंच्या काळात झाले, अशी टीका भाजपाकडून होते. सगळे काही नेहरूंनी केले…भाजपवाल्यांचा जन्मही नेहरूंच्या काळात झाला…मग त्यात नेहरूंचा काय दोष अशी खिल्लीही उडवली. सरदार वल्लभभाई पटेल यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध होता. वल्लभभाईंना पंतप्रधान केले असते तर संघ राहिलाच नसता, असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *