शनिवारी संध्याकाळी अमृतसरमध्ये अमेरिकेतून निर्वासित झालेल्या ११९ भारतीयांना घेऊन जाणारे दुसरे विमान उतरण्याच्या पूर्वी, पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते भगवंत मान यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर हल्ला चढवला. मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, बेकायदेशीर स्थलांतर हा केवळ पंजाबचा मुद्दा आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका केंद्र सरकारवर केली.
अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना, दुसऱ्या विमानात पंजाबमधून ६७ आणि हरियाणातून ३३ जणांसह विविध राज्यांमधून निर्वासित आले आहेत.
अमेरिकेतून आलेले पहिले विमान ५ फेब्रुवारी रोजी १०४ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन आले होते. या विमानात गुजरात आणि हरियाणातून प्रत्येकी ३३ आणि पंजाबमधून ३० होते. ज्यामुळे विमानातील प्रवाशांना “अमानुष वागणूक” दिल्याबद्दल संसदेत आणि बाहेर विरोधी पक्षांनी निदर्शने केली. काँग्रेस आणि आपसह विरोधी पक्षांनी असे निदर्शनास आणून दिले होते की, भारतीय निर्वासितांना अमेरिकन लष्करी विमानातून नेण्यात आले आणि त्यांना “हातकड्या आणि बेड्या” घालण्यात आले होते.
अमेरिकेतून बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांचे असे तिसरे विमान १६ फेब्रुवारी रोजी येणार आहे.
या विमानांचे लँडिंग स्थळ म्हणून अमृतसर निवडण्याच्या केंद्राच्या निर्णयाकडे लक्ष वेधत, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या मुद्द्यावर पंजाबविरुद्ध “भ्रष्टाचार मोहीम” चालवल्याचा आरोप करत म्हणाले की, पंजाबी नेहमीच केंद्राच्या प्रतिगामी धोरणांविरुद्ध उभे राहिले आहेत, म्हणूनच भाजपा त्यांच्याविरुद्ध नाराज आहे आणि त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा कट रचत आहे.
निर्वासित विमानांभोवतीचा वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीच्या पार्श्वभूमीवर आला आहे. मुख्यमंत्री भगवत मान पुढे म्हणाले की, मोदी त्यांचे मित्र (अमेरिकेचे अध्यक्ष) डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी हस्तांदोलन करत असताना, भारतीय नागरिकांना लष्करी विमानातून साखळदंडांनी बांधून परत पाठवले जात होते. साखळदंडांनी बांधलेल्या भारतीयांना परत पाठवणे ही ट्रम्पची मोदींना परतीची भेट आहे, असा आरोपही यावेळी केला.
“आप” नेत्याने याआधीही पहिले विमान अमृतसरमध्ये उतरविण्यावरून प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, आपल्या देशासाठी ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की अमेरिका आपल्या नागरिकांना हातकड्या आणि बेड्या घालून पाठवते. अमेरिकेतून हद्दपार केलेल्या भारतीयांच्या जखमांवर मलम लावण्याऐवजी… मोदींचे हरियाणा सरकार त्यांना पोलिसांच्या कैद्यांच्या व्हॅनमध्ये घेऊन जात आहे. हे त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे असल्याची टीकाही यावेळी केली.
पंजाब आप अध्यक्ष अमन अरोरा यांनीही पहिले विमान उतरल्यानंतर अशाच प्रकारची चिंता व्यक्त केल्या करताना राज्याची “बदनामी” करण्याच्या उद्देशाने भाजपाची “पंजाबविरोधी भूमिका” असल्याचे म्हटले होते.
आप व्यतिरिक्त, शेतकरी आणि नागरी समाज संघटनांच्या एका गटानेही भाजपावर विविध मुद्द्यांवर पंजाबविरुद्ध “पक्षपाती” असल्याचा आरोप केला आहे. “पंजाबमध्ये भाजपाचे बहुमत असलेले सरकार नसल्याने, ते वारंवार आम्हाला बाजूला सारल्यासारखे वाटतात,” असे भारतीय किसान युनियन (क्रांतिकारी) च्या सरचिटणीस सुखविंदर कौर म्हणाल्या, जे पिकांसाठी कायदेशीररित्या हमी दिलेली किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मागण्यासाठी शंभू सीमेवर निदर्शने करत आहेत.
संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) चे समन्वयक जगजीत सिंग दलेवाल यांनी बेकायदेशीर स्थलांतराचा मुद्दा पंजाबच्या आर्थिक संकटाशी जोडला. “लोक पहिल्यांदाच पंजाब सोडून का जात आहेत याचे विश्लेषण करायला हवे. शेती फायदेशीर नाही आणि तरुणांना चांगल्या संधींसाठी स्थलांतर करण्याशिवाय पर्याय नाही. एमएसपीच्या कायदेशीर हमीची आमची मागणी केवळ पंजाबमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात स्वयंरोजगार सुनिश्चित करण्यासाठी आहे, असेही १२ फेब्रुवारी रोजी खानौरी सीमेवर किसान महापंचायतीला संबोधित करताना सांगितले.
भाजपा नेत्यांनी असा युक्तिवाद केला की मोदींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाने पंजाबसाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे. १९८४ च्या शीख विरोधी दंगली प्रकरणात माजी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना बुधवारी झालेल्या शिक्षेवर प्रकाश टाकत, प्रदेश भाजपने दीर्घकाळ प्रलंबित प्रकरणांमध्ये न्याय मिळवून दिल्याबद्दल केंद्राचे कौतुक केले. प्रदेश भाजप अध्यक्ष सुनील जाखड यांनी शीख भावनांबद्दल मोदींच्या वचनबद्धतेबद्दल संसदेत आभार मानण्याचा ठराव मंजूर करण्याचा सल्लाही दिला.
त्याचबरोबर अमेरिकन विमान अमृतसरमध्ये उतरविण्याच्या वादावर वेगवेगळ्या स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. “भाजपा काहीही दावा करत असला तरी, येथील लोकांना सत्य माहित आहे. तुम्ही रोजंदारीवर काम करणारे आहात की सहा आकडी पगार मिळवणारे आहात हे महत्त्वाचे नाही – केवळ अमृतसरलाच निर्वासित विमानांसाठी निवडले जात आहे हे पाहून सर्वांनाच त्रास होत असल्याचे लुधियाना येथील इमिग्रेशन सल्लागारांनी मत व्यक्त केले.
लुधियानाचे आणखी एक रहिवासी, सॉफ्टवेअर इंजिनिअर जसकीरत सिंग यांनी या प्रकरणावर निराशा व्यक्त केली. “जर निर्वासित विमाने अमृतसरमध्ये उतरत राहिली तर असा संदेश जाईल की बेकायदेशीर स्थलांतरितांमध्ये पंजाबी लोकांचा मोठा वाटा आहे, जे खरे नाही. निर्वासित संपूर्ण भारतातील आहेत. वाद टाळण्यासाठी राष्ट्रीय राजधानीची निवड करायला हवी होती, असे यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya