Breaking News

विधानसभा निडणूकीची प्रशासनाकडून तयारी सुरु; ऐन गणेशोत्सवात आचारसंहिता ? महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणार विधानसभेच्या निवडणूका

मागील काही दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणूकीचा माहोल बनविण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधकांकडून सुरु झालेला आहे. सत्ताधारी महायुतीतील एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाकडून सध्या समाजातील विविध समाजघटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने लोकसभा निवडणूकीसाठी जाहिरनाम्यातील अनेक घोषणा थोड्याशा बदल करत जाहिर करण्याचा सपाटा लावला आहे. तर दुसऱ्या बाजूला विरोधकांकडून भाजपाकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर कसा करण्यात येत आहे यावरून आणि हिंदूत्ववादी राजकारणामुळे निर्माण होत असलेल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थिवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

या सगळ्या घडामोडीत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या निवडणूक मुख्याधिकाऱ्यांना आणि राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविले असून २० ऑगस्टपूर्वी प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे स्पष्ट आदेश बजावले आहेत. तसेच या बदल्या करताना ज्या अधिकारी-कर्मचारी-अधिकाऱ्याच्या नियुक्तीस ३ वर्षे पूर्ण होत आहेत, किंवा त्यास तीन वर्षे पूर्ण होत आहेत त्याची बदली करण्यात यावी, तसेच त्या अधिकाऱ्याची नियुक्ती त्याच्या गृह जिल्ह्यात करण्यात येवू नये किंवा संबधित अधिकाऱ्याची नियुक्ती असेल तर त्याची गृह जिल्ह्यातून बदली करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आली आहे.

राज्यातील विद्यमान विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत आली आहे. तर हरियाणा विधानसभेची मुदत ३ नोव्हेंबर रोजी संपणार असून झारखंड विधानसभेची ५ जानेवारी २०२४ रोजी संपणार आहे. याशिवाय जम्मू काश्मीर राज्यातही विधानसभेच्या निवडणूका घेण्याचा प्रयत्न केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे या चारही राज्यातील निवडणूका एकत्रित घेण्याचा मानस निवडणूक आयोगाचा आहे.

विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून संपूर्ण देशभरात सण-उत्सव सुरू होतात. त्यामुळे या सण-उत्सवाच्या काळात निवडणूका घेणे अडचणीचे ठरू शकते. तरीही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ऐन गणेशोत्सावाच्या काळात निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्याचा विचार आहे. त्यास राज्य सरकारकडूनही हिरवा कंदील दाखविला आहे. विशेषतः पाच दिवसांचे किंवा १० दिवसांचे गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर लगेचच आचारसंहिता जाहिर करण्याचा विचार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात आचार संहिता जाहिर केल्यानंतर घटनात्मक तरतूदीनुसार तर ४५ दिवसांचा कालावधी सर्वच राजकिय पक्षांना प्रचारासाठी देणे आवश्यक आहे, तसेच विद्यमान विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्यामुळे २६ नोव्हेंबर २०२४ पूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तिवात येऊ शकेल आणि नवे सरकारही स्थापन करता येऊ शकेल. त्यामुळेच गणेशोस्तव काळात किंवा संपल्यानंतर लगेच आचारसंहिता जाहिर करणे क्रमप्राप्त आहे.

दरम्यान, दिवाळीपूर्वी विधानसभा निवडणूक मतदानाची प्रक्रिया पूर्ण पाडली जाण्याची शक्यता असून दिवाळीनंतर राज्यात नवे सरकार स्थानापन्न झालेले असण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पाठविलेले हेच ते पत्रः-

Check Also

सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन नाकारला सीबीआयला बजावली न्यायालयाची नोटीस

कथित दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याच्या संबंधात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने नोंदवलेल्या भ्रष्टाचार प्रकरणात दिल्लीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *