१४४ वर्षानंतर महाकुंभ मेळावा आल्याचे सांगत आणि हा महाकुंभ महिनाभर चालणार असल्याचा प्रचार उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारने देशभरात मोठ्या प्रमाणावर केला. या महाकुंभबद्दल आस्था निर्माण व्हावी याकरिता मोठमोठ्या राजकीय नेत्यांना आणि त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक भाजपाशासित राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री या सर्वांसह फिल्मी सेलिब्रिटी, उद्योग क्षेत्रातील उद्योजक आदी व्हीव्हीआयपींनी आतापर्यंत हजेरी लावली.
मात्र काल महाकुंभच्या परिसरात १५ टेंटला आग लागून जळून खाक झाले. तर दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली होती. परंतु रेल्वे प्रशासनाने अचानक रेल्वेचा फलाट बदलल्याने निर्माण झालेल्या गोंधळात चेंगरा चेंगरीची घटना घडली. या घटनेत १५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यांनी महाकुंभ फालतू असून जाण्यात काही अर्थ नाही असा आरोपही केला. ते एका वृत्तसंस्थेशी बोलत होते.
या घटनेवर बोलताना लालू प्रसाद यादव म्हणाले की, हि घटना अंत्यत दुर्दैवी आहे. रेल्वेच्या गैर व्यवस्थापनामुळे इतक्या लोकांचा जीव गेला. रेल्वे मंत्र्यानी याची जबाबदारी स्विकारली पाहिजे अशी मागणी करत महाकुंभच्या गर्दी व्यवस्थापनाबाबत म्हणाले की, महाकुंभ फालतू आहे, तेथे जाण्यात काही अर्थ नाही अशी प्रतिक्रियाही यावेळी व्यक्त केली.
शनिवारी दिल्लीच्या रेल्वे स्थानकात रात्री १० च्या सुमारास फलाट क्रमांक १४ आणि १५ वर प्रयागराजला जाणाऱ्या दोन गाड्या रद्द करण्यात आल्याची अफवा पसरली. त्यानंतर दिल्लीहून प्रयागराजला जाणाऱ्या नागरिकांमध्ये एकच धावपळ सुरू झाली आणि चेंगरा चेंगरीची घटना घडली. त्यानंतर या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या चौकशीसाठी एका समितीची स्थापना करण्यात आली.
Marathi e-Batmya