केंद्रीय मंत्री गडकरींच्या मध्यस्थीने मातोश्रीशी बोलणी होणार उध्दव ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचे प्रयत्न

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यातील सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेला राजकिय घोळावर तोडगा काढण्यासाठी भाजपाने पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मध्यस्थी मार्फत बोलणी करण्याच्या हालचाली भाजपाकडून करण्यात येत असल्याची माहिती भाजपामधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर होवून १२ दिवस उलटून गेल्यानंतर भाजपा आणि शिवसेने दरम्यान तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी संपर्क कोण करणार असा सवाल भाजपामधील नेत्यांकडूनच करण्यात येत होता. दिल्लीतही भाजपा विधिमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईलाही फारसे फळ आले नसल्याची चर्चा भाजपामध्ये रंगलेली असताना युतीतील घोळ मिटविण्याचे आव्हान भाजपासमोर निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
अखेर शिवसेना आणि भाजपामध्ये निर्माण झालेल्या तणावावर तोडगा काढण्यासाठी गडकरी यांच्या नेतृत्वाखाली उद्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी आज झालेल्या प्रदेश भाजपाच्या सुकाणू समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती गडकरी यांना देण्यात येणार आहे. ही माहिती त्यांना दिल्यानंतर उद्या बुधवारी गडकरी यांचे मुंबईत आगमन होवून मग पुढील चर्चेला सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यासाठी मातोश्रीवर वेळ घेण्यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच उध्दव ठाकरे यांच्याशी कसल्याही परिस्थितीत उद्याच चर्चा करायची असेही निश्चित करण्यात आल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
शिवसेनेसाठी सत्तास्थापनेसाठी एक प्रस्ताव
मुख्यमंत्री पदावर शिवसेनेने उभा दावा ठाकल्याने सेनेच्या अपेक्षा पूर्ण करणारा प्रस्ताव नितीन गडकरी यांच्या माध्यमातून उध्दव ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात येणार आहे. त्या मांडण्यात येणाऱ्या प्रस्तावावरच चर्चा करून शिवसेनेला राज्याच्या सत्तेत सहभागी करून घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपमधील अन्य एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

About Editor

Check Also

राहुल गांधी यांचा भाजपावर आरोप, भारताचा निवडणूक नकाशा चोरण्याचा प्रयत्न ओबीसींचे अधिकारही नाकारण्याचा प्रयत्न

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी संसदेत जोरदार हल्ला चढवला. महिला आरक्षण चौकट आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *