१२ आमदारांच्या “त्या” निर्णयाप्रकरणी महाराष्ट्र विधिमंडळाचे राष्ट्रपतींना साकडे विधानमंडळाच्या अधिकाराचा संकोच होतोय परामर्श घ्या, राष्ट्रपतींना विनंती-सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

मराठी ई-बातम्या टीम

विधानसभेने ठराव संमत करून गैरवर्तनाबद्दल १२ सदस्यांचे १ वर्षासाठी केलेले सदस्यत्व निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले. या निर्णयामुळे देशातील विधिमंडळांच्या सार्वभौम सभागृहांच्या अधिकाराचा संकोच होत राज्यघटनेला अभिप्रेत असलेले तीन स्तंभांमधील “सत्ता संतुलन आणि सत्ता नियंत्रण हे तत्त्व बाधित झाले आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद १४३ नुसार राष्ट्रपती यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयासंदर्भात परामर्श घ्यावा, अशी विनंती राष्ट्रपती यांना करण्यात आली असल्याची माहिती, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानभवन येथे आयाजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राजभवन येथे भेट घेवून त्यांची स्वाक्षरी असलेले निवेदन राष्ट्रपती यांना सादर केले.

राष्ट्रपती यांची भेट घेतल्यानंतर सभापती निंबाळकर याबाबतची माहिती देतांना म्हणाले, राष्ट्रपती यांना सादर केलेल्या निवेदनात, विधानसभेने बेशिस्त वर्तनासंदर्भात संमत केलेला ठराव आणि त्यानंतरची कारवाई हा पूर्णतः विधानमंडळाच्या अधिकार कक्षेतील विषय आहे. सभागृहाने संमत केलेल्या ठरावाविरुध्द न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकत नाही. विविध राज्यातील केवळ उच्च न्यायालये नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने देखील राजाराम पाल प्रकरणात (सन २००७) हाच मुद्दा अधोरेखित करत निर्णय दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाविषयी पूर्ण आदर व्यक्त करत आम्ही, सभागृहाचे अधिकार,  विशेषाधिकार आणि उन्मुक्ती यांना बाधा उत्पन्न होऊ नये या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधू इच्छितो. राज्यघटनेतील अनुच्छेद १४३ नुसार राष्ट्रपती यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयासंदर्भात परामर्श घ्यावा. २८ जानेवारी, २०२२ च्या या निर्णयामुळे केवळ देशातील राज्य विधानमंडळेच नव्हे तर संसदेच्या देखील कर्तव्यवहनासाठी आवश्यक असलेल्या अधिकार कक्षेला बाधा पोहचली आहे. त्यामुळे आपण याबाबत परामर्श घ्यावा आणि या निर्णयाचा फेरविचार व्हावा, याकरिता निर्देश देण्याची विनंतीही राष्ट्रपती यांना केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

About Editor

Check Also

पंतप्रधान मोदी यांची माहिती, अर्थसंकल्प हा तयारी आणि प्रेरणेतून तयार केलेला एका लेखी मुलाखती दरम्यान व्यक्त केली भावना

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ हा “आता किंवा कधीच नाही” हा जबरदस्तीतून निर्माण झालेला क्षण नव्हता तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *