मुलीवरील ‘त्या’ आरोपावरून स्मृती इराणी यांची काँग्रेस नेत्यांना नोटीस आरोप मागे घ्या लेखी माफी मागा

मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीवर गोव्यात अवैध मद्यालय आणि बीफ आणि पोर्क मासांचे जेवण त्यांच्या हॉटेलच्या ग्राहकांना देण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. आता या आरोपानंतर स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेश, नीता डिसुजा यांना नोटीस बजावित लिखीत माफी मागा आणि आरोप मागे घ्या अशी मागणी केली.

आपण सर्वांकडून आमच्या अशिलाची तसेच कुटुंबाच्या प्रतिष्ठेची बदनामी केली जात आहे. आमच्या अशिलाच्या मुलीने कोणताही बार सुरु करण्यासाठी तसेच कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी अर्ज केलेला नाही. तसेच गोव्यातील उत्पादन शुल्क विभागाकडूनही इराणी यांच्या मुलीला कोणतीही नोटीस आलेली नाही, असे या नोटिशीत म्हणण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. गोव्यात इराणी यांच्या कन्येद्वारे चालवल्या जाणाऱ्या उपाहारगृहात मद्यसेवा देण्यासाठी नकली परवाना दिला गेल्याचा आरोप आहे. ही माहिती ‘सूत्रांवर’ विसंबून दिली गेलेली नाही. कुठल्याही संस्थेने अथवा राजकीय सूडबुद्धीने प्रेरित होऊन आम्ही हा आरोप केलेला नाही. तर माहितीच्या अधिकारातून उघड झालेल्या माहितीद्वारे तसे स्पष्ट झाले आहे. ‘सिली सोल्स कॅफे अँड बार’साठी इराणी यांच्या कन्येने खोटी कागदपत्रे देऊन मद्यालय परवाना मिळवल्याचे या माहितीद्वारे स्पष्ट होते, असा दावा खेरा यांनी केला आहे.

२२ जून २०२२ रोजी परवाना नूतनीकरणासाठी ज्या ‘अँथनी डीगामा’ यांच्या नावाने अर्ज केला गेला, त्या व्यक्तीचे मागील वर्षीच निधन झाले आहे. अँथनींच्या आधारकार्डानुसार ते मुंबईच्या विलेपार्लेचे रहिवासी असल्याचे समजते. माहितीच्या अधिकाराद्वारे ही माहिती मिळवणाऱ्या वकिलांना अँथनींचे मृत्यू प्रमाणपत्रही मिळाले आहे. या कागदपत्रांद्वारे असे निदर्शनास येते, की या मद्यालय परवान्यासाठी आवश्यक उपाहारगृहाच्या परवान्याशिवायच मद्यालय परवाना देण्यात आला. पंतप्रधानांनी स्मृती इराणी यांना मंत्रीपदावरून हटवावे, अशी मागणीही खेरा यांनी केली.

About Editor

Check Also

राज्यातील सर्व ९८८ मिथेनॉल परवानेधारक संस्थांच्या तपासण्या फास्ट ट्रॅकवर २२६ तपासण्या पूर्ण; ५१ संस्था बंद, पुणे विषारी दारू प्रकरणानंतर कारवाई

पुण्यातील विषारी दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर राज्यातील सर्व ९८८ मिथेनॉल परवानेधारक संस्थांच्या तपासण्या फास्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *