पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीच्या ‘माझा बूथ सर्वात मजबूत ‘ या उपक्रमाद्वारे राज्यातील पक्षाच्या १ लाख बूथ प्रमुखांशी नमो ॲपच्या माध्यमातून आणि ऑनलाइन संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे बूथ पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होईल आणि पक्षाच्या विजयाच्या दिशेने आणखी एक पाऊल पडेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांचा हा विशेष संवाद कार्यक्रम भारतीय जनता पार्टी च्या विधानसभा निवडणूक तयारीचा महत्वाचा भाग आहे. या विशेष संवादामुळे बूथच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळणार असून नव्या जोमाने ते कामाला लागतील असा विश्वास मला आहे. पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी एकजुटीने मतदानादिवशी काम करणे आणि बूथ स्तरावर पक्षाची पकड मजबूत करणे हे या अभियानामागचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.
चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, बूथ प्रमुख आणि पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा निवडणुकीच्या व्यवस्थापनातील कणा असून त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. म्हणूनच कायमच पक्षाने कार्यकर्त्यांना महत्व दिले. या संवादाच्या माध्यमातून पक्ष कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेतील त्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या देखील स्पष्ट केल्या जातील असे सांगत विधानसभा निवडणुकीत भाजपाला विजयी करण्यासाठी आज प्रत्येक कार्यकर्ता झटत आहे .जनतेपर्यंत पक्षाच्या जाहीरनाम्यातील मुद्दे आणि कल्याणकारी योजनांचे लाभ सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजपा हा एकमेव असा पक्ष आहे ज्याच्याकडे बूथ पातळीवर नि:स्वार्थ भावनेने काम करणारे कार्यकर्ते आहेत. समर्पित वृत्तीने काम करणारे पक्षाचे असंख्य कार्यकर्ते हेच पक्ष संघटनेचा आधार आहेत या शब्दात कार्यकर्त्यांच्या मेहनतीची प्रशंसा केली.आजचा सामान्य कार्यकर्ता हाच भविष्यात समर्पित जनसेवेमुळे पक्षाचा नेता बनतो हे पक्षाचे वैशिष्ट्य असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya