चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश, प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी आवश्यक जागेचा प्रस्ताव सादर करा महसूल विभागाने प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात प्रस्तावित जंक्शन एमआयडीसी साठी  लागणा-या अतिरिक्त जागा मागणीचा प्रस्ताव उद्योग विभागाने महसूल विभागाकडे सादर करावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महसूल विभागाने प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

मंत्रालयात प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील जमिनीसंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, पणन मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री योगेश कदम, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मंजिरी मनोलकर, व्ही.सी.व्दारे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भिसे यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पूर्वी झालेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर परिसर येथे नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याकरिता मौजे जंक्शन, मौजे भरणेवाडी, मौजे अंथुर्णे, मौजे लासुर्णे येथील जमिनीसहित इतर अतिरिक्त लागणा-या जमिनीबाबतचा सविस्तर प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योग विभागामार्फत महसूल विभागाकडे सादर करावा. हा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात येईल असेही सांगितले.

महसूल विभागाने प्रस्तावित जंक्शन एमआयडीसी जागा उपलब्ध करून द्यावी : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषि मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर परिसर येथे प्रस्तावित जंक्शन एमआयडीसी स्थापन करण्यात येणार आहे. सध्या असलेल्या जमिनीसहित एमआयडीसीसाठी अतिरिक्त जमिनीची आवश्यकता आहे. मौजे जंक्शन,मौजे भरणेवाडी,मौजे अंथुर्णे,मौजे लासुर्णे येथील जमिनीसहित या क्षेत्रालगत असलेल्या शेती महामंडळाचे सलग १००० एकर क्षेत्र नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात यावे. या ‘एमआयडीसी’मुळे अनेक उद्योग इंदापूर तालुक्यात येणार आहेत. तसेच तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. इंदापूर तालुक्यांतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ही एमआयडीसी उपयुक्त ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

About Editor

Check Also

विजय वडेट्टीवार यांची टीका, अभिभाषणात जुन्याच मुद्याची घासून पूसून उजळणी राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे आकड्यांची फेकाफेक

राज्यपालांच्या अभिभाषणात कर्जमुक्त शेतकरी, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र दिसला नाही.हे भाषण म्हणजे शब्दांचा बाजार आणि आकड्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *