विजय वडेट्टीवार यांचा इशारा, भारत आणि अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन चंद्रपूर महापालिका प्रकरणी माफी मागितली ही बातमी खोडसाळपणा, माझी चूक नाही तर माफी का मागीन?

भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार कराराने भारतातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. महाराष्ट्रातील मका, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे याविरोधात काँग्रेस आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

काल दिल्ली इथे काँग्रेस पक्षश्रेष्ठी बरोबर झालेल्या बैठकीत भारत-अमेरिका करार, त्याचे शेतकऱ्यांवर होणारे परिणाम यावर चर्चा झाली. महाराष्ट्रात यवतमाळ इथे ७ मार्च रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. अमेरिकेतून येणाऱ्या मालावर शून्य टक्के कर, तर भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर १० टक्के कर आकारला जाणार आहे. या असमान धोरणामुळे महाराष्ट्रातील कापूस, मका, तूरडाळ आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होईल, अशी भीताही यावेळी विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सध्या कापूस ४,५०० रुपये दराने विकला जात आहे, मक्याला केवळ १,५०० रुपये भाव मिळत आहे. सोयाबीनचे भाव कोसळले आहेत, पण सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा ‘शक्तिपीठ’ महामार्गासाठी जमिनी बळकावण्यात जास्त रस आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करणारे हे सरकार आहे अशी टीका केली.

दिल्ली इथे पक्षश्रेष्ठींबरोबर झालेली बैठक ही भारत अमेरिका व्यापार करार आणि त्याच्या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी होती.
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. चंद्रपूर प्रकरणात काही चूक नसताना मी माफी का मागीन? काही हितशत्रू जाणून बुजून बातम्या पेरत आहे, ज्यांना स्वतःची नगरपरिषद जिंकता आली नाही ते इतराना प्रश्न विचारत आहे असा खोचक टोलाही यावेळी लगावला.

मुंबईचे ‘गुजरातीकरण’ करण्याच्या प्रयत्नात मराठी शाळांचा बळी दिला जात असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी करत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात तब्बल २२ हजार शाळा बंद पडल्या आहेत, तर ४ हजार शाळांमध्ये शिक्षकच नाहीत. हे आकडे स्पष्ट करतात की सरकार जाणीवपूर्वक शाळा बंद करण्याचा घाट घालत आहे. विशेषतः मुंबईतील मराठी शाळा बंद पाडून मुंबईचे ‘गुजरातीकरण’ करण्याचा सरकारचा छुपा अजेंडा आहे. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार व्हावा, हेच सरकारचे धोरण आहे का असा सवालही यावेळी केला.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, सिन्नरची घटना असो किंवा बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचार, राज्यात कायद्याचा धाक उरलेला नाही. मुली बेपत्ता होत आहेत, महिलांचे शोषण सुरू आहे. गृहखाते नेमके काय करत आहे? या प्रकरणांच्या चौकशीसाठी तातडीने स्पेशल टीम नेमली पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात उपस्थित होते. राहुल गांधी कोणत्याही दबावाला किंवा केसेसला घाबरणारे नाहीत. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुलजींची भीती वाटते, हे वारंवार सिद्ध झाले आहे. सत्यासाठी लढणाऱ्या माणसाला अशा कारवायांनी रोखता येणार नाही. कितीही केसेस केल्या तरी काँग्रेस लढत राहील असा निर्धारही यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राहुल गांधी भारतीय जनता पक्षाच्या धमक्यांना घाबरणारे नेते नाहीत मुंबई विमानतळावर राहुल गांधी यांचे काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

जननायक राहुल गांधी हे देशहितासाठी निडर आणि बेधडकपणे काम करत आहेत. देशातील लोकशाही व संविधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *