शिवेंद्रराजे भोसले यांची माहिती, मुंबई-गोवा महामार्गाचे काम नव्या एजन्सीला दिले विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या दरम्यान दिली माहिती

मुंबई–गोवा महामार्गावरील प्रलंबित कामांना गती देण्यात आली असून माणगाव व इंदापूर बायपासची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. माणगाव व इंदापूर बायपास वगळता उर्वरित मुंबई–गोवा महामार्ग (एनएच-66) मे महिन्यापर्यंत पूर्णत्वाला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे या सदस्यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता.

माणगाव बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम नव्या एजन्सीकडून सुरू असून ते प्रगतीपथावर असल्याचे सांगून मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, माणगाव व इंदापूर बाह्यवळण मार्गासह तीन रेल्वे उड्डाणपूल आणि दोन मोठे पूल या कामांचा समावेश प्रकल्पात आहे. ही कामे जुलै २०२५ मध्ये सुरू करण्यात आली असून जुलै २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. संबंधित ठेकेदार काम न करत नसल्याने त्याच्याकडून ते काम काढून घेऊन नव्या एजन्सीला देण्यात आल्याचे सांगितले.

पुढे बोलताना शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, कोकणातील गणेशोत्सव काळातील वाहतूक कोंडी लक्षात घेता माणगाव–महाड मार्गावरील ताम्हिणी घाटाचा बाह्य वळण मार्ग पावसाळ्यापूर्वी, म्हणजे मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा मानस आहे. त्यामुळे माणगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

शिवेंद्रराजे भोसले पुढे म्हणाले की, चिपळूण येथील पूल मे २०२६ पर्यंत पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असून मुख्य काम पूर्णत्वास आले आहे. तसेच संगमेश्वर येथील हातखंबा उड्डाणपुलाचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. गांधार पाले लेण्याजवळील रेस्ट एरिया (पार्किंग, टॉयलेट्स, कॅफेटेरिया) येथे झालेल्या तोडफोडीबाबत १६ डिसेंबर २०२५ रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, पूर्वी तेथे एकच सुरक्षा रक्षक असताना आता चार रक्षक नेमण्यात आले आहेत. तसेच सीसीटीव्ही बसविण्याची प्रक्रिया सुरू असून भविष्यातील सुरक्षेसाठी सर्व रेस्ट एरियांसाठी मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले.

शेवटी बोलताना शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, गांधार लेण्यापरिसरातील रेस्ट एरियामध्ये पर्यटन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आवश्यक सुधारणा केल्या जातील, असेही सांगितले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, १ जुलैपासून वाहनांना एचएसआरपी बसविणे अनिवार्य नियमभंग केल्यास १ हजार रुपयांचा दंड

राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्याबरोबरच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने १ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *