पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल, डीजल वापर कमी करणे तसेच मेट्रो सारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले असले तरी त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री व मंत्री त्याकडे कानाडोळा करत आहेत. मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या अर्धी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे पण मुंबई सारख्या शहरात मेट्रो, बेस्ट, लोकल रेल्वे सेवा आहे तर इतर शहरातही सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय आहे. मुंबईला येताना व इतर प्रवास करण्यासाठी एस टी महामंडळाच्या बसेस वापरून ‘राष्ट्र प्रथम’ ही भूमिका अंगिकारावी आणि देशभक्ती दाखवावी,असे आव्हान मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिले.
भाजपा सरकारवर तोफ डागत खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानुसार त्याग करण्याचे काम काय फक्त सर्व सामान्य जनतेने करायचे आणि सत्तेतील भाजपाच्या नेत्यांनी जनतेच्या पैशावर मौज करायची ? ही कसली देशभक्ती आहे. सर्व सामान्य माणूस दररोज रोजीरोटीसाठी पेट्रोलचे वाहन वापरतो, तो मौज नाही करत. सर्वसामान्य जनतेच्या वापराने पेट्रोल डिझेलचे संकट ओढवणार नाही. मंत्र्याच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करून फडणवीस काय उपकार करतात काय. एक मंत्री एकच वाहनही वापरता येऊ शकते पण भाजपाला सत्तेचा माज आहे.
वर्षा गायकवाड पुढे बोलताना म्हणाल्या की, आठवड्यातून एकदा मेट्रो प्रवास करून इव्हेंटबाजी करू नका. त्याग दुस-यांनी करायचा आणि जनतेच्या पैशावर हे स्वतः गाड्यांचा ताफा वापरणार हे काही बरोबर नाही. सर्व कामकाज ऑनलाईन पद्धतीने करता येते. कोविड संकटात सर्व जग ऑनलाईन होते मग आता तसे कामकाज करता येऊ शकते..
शेवटी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, परदेश दौरा करू नका असे सांगणारे महाशय स्वतः परदेश दौऱ्यावर निघून गेले हा दुतोंडी प्रकार जनतेला समजत नाही का. मुळात हे संकट नरेंद्र मोदी यांच्या बेफिकीर व हुकुमशाही प्रवृत्तीने ओढवले आहे. युद्ध सुरू होताच जगभरातील देशांनी इंधनाचा संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन उपाय योजना केल्या पण तथाकथित विश्वगुरू व त्यांचे सहकारी मंत्री आसाम , पश्चिम बंगाल निवडणूक चोरी करण्यात व्यस्त होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कशाचेही गांभीर्य नाही. रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता, तसेच देश संकटात असला तरी मोदी स्वतः मात्र इव्हेंटबाजी व चमकोगिरी करत फिरत असतात. ‘बडे मियां तो बडे मियां, छोटे मियां भी सुभानल्ला’, अशी भाजपाच्या मुख्यमंत्र्यांची अवस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला उपदेश व सल्ले देण्यापेक्षा स्वतः पासून काटकसरीची सुरूवात करावी, असेही सुनावले.
Marathi e-Batmya