आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार गंभीरपणे लक्ष देत नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. या वेळी मोर्चाचे नेतृत्त्व करणाऱ्या राजू शेट्टी, विनायक राऊत, महादेव जानकर, हर्षवर्धन सपकाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वर्षा बंगल्याकडे जाण्याच्या मार्गावर मोर्चा सुरु होण्याच्या आधीच सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
राजू शेट्टी यांनी आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राज्य सरकार नियम आणि कायदे पायदळी तुडवत सत्ता चालवत असेल, तर शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या न्यायासाठी सविनय कायदेभंग केला तर त्यात चुकीचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या वर्षा बंगल्यावर हा मोर्चा जाणार होता. मात्र, गिरगाव चौपाटी परिसरातच पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मोर्चा काढण्यासाठी जमा झालेल्या सर्व शेतकऱ्यांना तसेच नेत्यांनाही पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले. ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसने देखील या मोर्चाला पाठिंबा दिला होता.
मुंबईत आंदोलन करण्यासाठी जमलेल्या या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला.
पोलिसांनी दमदाटी करत ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राजू शेट्टी यांनी सरकार आणि पोलिस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नसताना पोलिसांनी दमदाटी करत आम्हाला ताब्यात घेतले. आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी आम्हाला अडवण्याचा अधिकार पोलिसांना नाही, असा आरोप त्यांनी केला. यावेळी धक्काबुक्की आणि उर्मट भाषेचा वापर झाल्याचाही आरोप त्यांनी केला. कायद्याचे पालन करण्याचे काम पोलिसांचे असताना तेच लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना रोखत असल्याची टीका त्यांनी केली.
राजू शेट्टी यांनी, सरकारवर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील शेतकरी रस्त्यावर उतरून न्याय मागत आहे. मुख्यमंत्री अनेकदा कोकण दौऱ्यावर आले, पण त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या नाहीत. साधं निवेदन स्वीकारायलाही वेळ दिला नाही, असे ते म्हणाले. कोकणातील शेतकरी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईत आला होता, मात्र त्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष करून पोलिसी कारवाई करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
Marathi e-Batmya