प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणा करा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीत “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा उद्घोषणा करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲउ. राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दिल्ली दौऱ्यावर असतांना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत विधानसभा अध्यक्ष यांनी पत्र दिले.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे केवळ देशातील महत्वाचे ऐतिहासिक रेल्वे स्थानक नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्य आणि राष्ट्रभक्तीच्या विचारांचे प्रतीक आहे. या स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले असून, देशभरातून दररोज हजारो प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि पराक्रमाचा संदेश देशभर पोहोचविण्याच्या दृष्टीने ही उद्घोषणा महत्त्वपूर्ण ठरेल, असे नार्वेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना सर्व समाजघटकांना सोबत घेतले. त्यांचे प्रशासन, शौर्य, लोककल्याणकारी धोरणे आणि राष्ट्रहिताची भूमिका आजही संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी अशा उपक्रमांना महत्त्व आहे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सीएसएमटी हे मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे महत्त्वाचे केंद्र आहे. या स्थानकावरून देशाच्या विविध भागांत जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेगाड्यांमध्ये होणाऱ्या उद्घोषणांमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केल्यास त्यांच्या कार्याचा संदेश महाराष्ट्राबरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित रेल्वे प्रशासनाला आवश्यक सूचना द्याव्यात आणि सीएसएमटी येथून येणाऱ्या व निघणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीत या उद्घोषणा करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली आहे.

About Editor

Check Also

मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहवालच सादर केला बीड जिल्हा प्रशासनाचा महसूल मंत्री कार्यालयाला प्राप्त अहवालच उत्तरा दाखल केला जाहिर

राज्यातील कुणबी समाजातील नागरिकांना मराठा ओबीसीचे प्रमाणपत्र न देण्याबाबतचे एक पत्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *