अभिनेता सलमान खान घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनने आत्महत्या केल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने शुक्रवारी नोंदवले. तसेच एका तरुणाला मारून पोलिसांना काय मिळणार आहे? त्याला इजा व्हावी असे कोणतेही कारण थापनच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या न्यादंडाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या अहवालातून समोर येत नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
उच्च न्यायालय पुढे म्हणाले की, आम्ही मृत थापनच्या आईची व्यथा, त्यांच्या मनातील पोलिंसावरील अविश्वास समजू शकतो. परंतु, एखाद्याला आत्महत्या करण्यास कशामुळे भाग पाडले जाते हे ठरवणे कठीण आहे. कोणीही कुणालाही इतके चांगले ओळखत नाही. आत्महत्येवेळी त्या व्यक्तीच्या मनात काय निर्माण होते, हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळेच आत्महत्या होत असतात, असेही न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने अधोरेखीत केले.
क्रॉफर्ड मार्केट येथील गुन्हे शाखेच्या कारागृहातील शौचालयात थापनचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या मृत्यूची चौकशी करणाऱ्या न्यादंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी खंडपीठासमोर सीलबंद अहवाल सादर केला. अहवाल पाहिल्यानंतर खंडपीठाने थापनच्या मृत्यूमध्ये काहीही गैर नसल्याची टिप्पणी केली. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये थापन अस्वस्थ अवस्थेत त्याच्या कोठडीत फिरताना आणि नंतर एकटाच शौचालयामध्ये जाताना दिसत आहे. त्यांच्यानंतर कोणीही शौचालयात गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नाही. त्यामुळे कोणीतरी त्याचा पाठलाग केला असता अथवा त्याच्यावर कोणी हल्ला केला असता तर अनुजने त्याविरोधात स्वरक्षणासाठी प्रतिहल्ला केल्याची दिसले असते, असेही न्या. चव्हाण यांनी अधोरेखित केले. तसेच पोलिसांनी १८ वर्षीय तरुणाला मारण्याचे कोणतेही कारण दिसून येत नाही. उलट पोलिसांना मदत करण्यासाठी तो सर्वोत्तम व्यक्ती ठरू शकला असता पोलीस त्याला माफीचा साक्षीदार करू शकले असते, असेही खंडपीठाने नमूद केले.
दुसरीकडे, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला न्यायदंडाधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल याचिकाकर्त्या रिटा देवी यांच्या वकिलांना
पुनरावलोकनासाठी देण्याचे आदेश दिले आणि डोळसपणे या प्रकरणाकडे बघण्याचा प्रयत्न करा, असा सल्लाही न्यायालयाने दिला. आई, आम्ही समजू शकतो. परंतु, भावनेच्या आहारी जाऊ नका, हे कोठडीतील मृत्यूचे प्रकरण नाही हे मानावेच लागेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले. तरीही कोणताही आदेश देण्याआधी कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहू, असेही न्यायालयाने शेवटी नमूद केले.
Marathi e-Batmya