रिकव्हरी रेट ५० टक्क्यावर मात्र मुंबईमध्ये नव्याने ५०० आयसीयू बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या बरे होण्याच्या दरात वाढ झाली असून हा दर आता ५० टक्केवर पोहोचला आहे. तसेच मुंबईतील कोरोनाची परिस्थिती पाहता अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार असून राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. जळगाव येथील बाधीत वृद्धेचा मृतदेह शौचालयात आढळून आल्याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, अधीक्षक, प्राध्यापक, नर्स आणि सुरक्षारक्षक यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
आज राज्यामध्ये कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री टोपे, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल तसेच काही जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांशी संवाद साधला.
राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास ५० टक्के
राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास ५० टक्के असून मुंबईतील धारावी बागातून गेल्या काही दिवसांपासून रुग्ण येण्याची संख्या मदावली आहे. अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना सेव्हन हिल, सेंट जॉर्ज येथे आठवडभरात सुमारे ५०० आयसीयू बेड उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाने कंटेनमेंट झोनसाठीचे निकष बदलावे
केंद्र शासनाने कंटेनमेंट झोनसाठी जे निकष केले आहेत त्यात बदल करण्याबाबतची मागणी टोपे यांनी यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली. कंटेनमेंट झोनमध्ये शेवटचा रुग्ण आढळल्यानंतर २८ दिवस त्या भागातील व्यवहार बंद ठेवले जातात. हा बंद काटेकोरपणे पाळला जावा यासाठी पोलिस तैनात केले जातात. त्यामुळे राज्यातील पोलिस मोठ्या संख्येने अशा कंटेनमेंट झोनच्या ड्युटीवर आहेत. त्यांना आराम मिळावा हा पोलिस फोर्स अन्यत्र वापरता यावा यासाठी २८ दिवसांच्या निकषाऐवजी १४ दिवस कंटेनमेंट झोनमध्ये व्यवहार बंद ठेवण्याबाबत विचार व्हावा व त्यावर केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना पाठविण्यात याव्या, अशी मागणी त्यांनी केली.
मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करावी
मुंबईमध्ये आरोग्य कर्मचारी, पोलिस, महापालिका कर्मचारी, खासगी रुग्णालयातील कर्मचारी तसेच शासकीय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
कोरोना व्यतिरीक्त अन्य जे आजार आहेत क्षयरोग, पावसाळ्यात होणारे आजार, मलेरिया, डेंग्यू याच्या नियंत्रणासाठी राज्य शासन सज्ज आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली दिली असली तरी लोकांनी स्वयंशिस्त पाळावी. मास्क वापरावे, सोशल डिस्टिंसिंग पाळावे, हात स्वच्छ धुवावेत आदी बाबी कटाक्षाने पाळण्याचे आवाहन त्यांनी केले.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांची माहिती,कॉर्पोरेट क्षेत्र आणि सामाजिक संस्थांच्याधील समन्वयाने आरोग्य सेवा सक्षम दुर्गम व आदिवासी भागांमध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी (सीएसइार)चा प्रभावी वापर

शासन, कॉर्पोरेट क्षेत्र आणि सामाजिक संस्थांच्याधील समन्वयाने राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचे आरोग्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *