शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई पालिकेवर मोर्चा काढत केला राडा

मुंबई महापालिकेकडून काही भागांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा सुरू आहे. याविरोधात आज शिवसेनेच्या ठाकरे गटाने मुंबई महापालिकेच्या (बीएमसी) कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला. आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा मुंबई महापालिकेच्या एच पूर्व कार्यालयात पोहोचल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याला मारहाण करत राडा केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या मारहाण झालेल्या अधिकाऱ्याकडून अद्याप तक्रार करण्यात आलेली नाही.

काही दिवसांपूर्वी वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली हीत. ही शाखा अनधिकृत असल्याचे सांगत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली. परंतु, यावरून ठाकरे गट आता आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी तर शिवसेना शाखेवरील कारवाईवरून महापालिकेतील अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला. त्यांच्याच नेतृत्वात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आज मोर्चा काढण्यात आला आहे.

यापाठोपाठ आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या एच पूर्व कार्यालयातील अधिकाऱ्यांना मारहाण केली आहे. मारहाण झालेल्या अधिकाऱ्यांकडून अद्याप तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यानंतर कारवाई करू असं पोलीस सूत्रांनी एका वृत्तवाहिनीने सांगितलं. वाकोला पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

ज्या अधिकाऱ्याला मारहाण झाली त्याची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे. थोड्याच वेळात ते पोलीस ठाण्यात जातील, तिथे संबंधित अधिकाऱ्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जाईल. त्यानंतर मारहाण करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाईल, असं वृत्त खाजगी वृत्तवाहिनीने दिले आहे.

दूषित पाणीप्रश्नी आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाच्या कार्यर्त्यांनी हा मोर्चा काढला होता. परंतु शिवसेनेची शाखा तोडल्याचा राग उफाळून आल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. वाकोला पोलिसांनी याबद्दल सांगितलं की अद्याप याप्रकरणी तक्रार प्राप्त झालेली नाही.

About Editor

Check Also

आयआयटी-मुंबईकडून साहिल वाकोडेच्या आत्महत्येप्रकरणी केलेल्या वक्तव्याची मागितली माफी कोणत्याही संचालकाचा राजीनामा नाही

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबईने एका विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या परिस्थितीसंदर्भात पूर्वी केलेल्या पत्रव्यवहाराबद्दल माफी मागितली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *