मीरा भाईंदर येथे पोलिसांनी सुरुवातीला मोर्चाला परवानगी नाकारली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना उबाठाच्य़ावतीने आज मीरा रोड येथे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भव्य मोर्चा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. “मराठी माणूस गप्प बसणार नाही” हा संदेश देत हजारो मनसे आणि शिवसेना उबाठाचे कार्यकर्त्यांसह स्थानिक मराठी नागरिक रस्त्यावर उतरले. विशेष म्हणजे या मोर्चामुळे मराठी अस्मितेच्या लढ्याला बळ मिळाले.
सकाळी ११ वाजता मीरा रोडच्या बालाजी हॉटेल सर्कलपासून मोर्चाची सुरुवात झाली. मनसे नेते संदीप देशपांडे, अभिजीत पानसे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. ठाकरे गटाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने या मोर्चात सामील होत मराठी अस्मितेचा जागर करताना दिसले. मोर्चा मीरा रोड स्टेशनपर्यंत मार्गस्थ झाला. हातात भगवे झेंडे, “मराठीचा अभिमान असू द्या”, “जय महाराष्ट्र” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. “मराठी भाषा आमची शान आहे”, “मायबोलीचा गौरव करू या” असे फलक हातात धरलेल्या नागरिकांनी उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले. मराठी तरुण-तरुणी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग या मोर्च्याचे वैशिष्ट्य ठरले.
मोर्च्याला सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांची धरपकड करत अटक केली, ज्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. काशिमीरा, नवघर आणि मीरा रोड पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह मोठा बंदोबस्त तैनात होता. सुरक्षेच्या कारणास्तव काही भागांत वाहतूक वळवण्यात आली. तरीही, मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शांतता राखत मोर्चा यशस्वीपणे पूर्ण केला आणि कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सुरुवातीला पोलिसांनी अनेक महिला कार्यकर्त्यांना अटक केली. परंतु मोर्च्यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची संख्या असल्याने काही कालावधीनंतर अटक केलेल्या महिला आणि नागरिकांना नंतर सोडून देण्यात आले.
मोर्चादरम्यान एकनाथ शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सहभागी होण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी “५० खोके, एकदम ओके” अशा घोषणा देत प्रचंड रोष व्यक्त केला. काही कार्यकर्त्यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर बाटली भिरकावली, आणि त्यांना मोर्चातून हाकलून देण्यात आले. प्रताप सरनाईक यांनी पोलिसांच्या कारवाईवर टीका करताना मोर्चाला पाठिंबा जाहीर केला होता, परंतु कार्यकर्त्यांनी त्यांना स्वीकारले नाही.
मोर्च्याच्या समारोपावेळी संदीप देशपांडे यांनी पोलिस आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. संदीप देशपांडे म्हणाले, “मराठी दुकानदारांवर कारवाई होत नाही, पण मराठी बोलायला सांगितल्यावर आमच्यावर गुन्हे दाखल होतात. हे आम्ही सहन करणार नाही.” त्यांनी पोलिसांच्या दडपशाहीचा आरोप करत प्रश्न उपस्थित केला, “जर व्यापाऱ्यांना रॅलीसाठी परवानगी मिळते, तर मराठी माणसाला का नाकारली जाते?” अभिजीत पानसे यांनीही मराठी नागरिकांच्या हक्कांसाठी लढा तीव्र करण्याचा इशारा दिला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही सरकारच्या धोरणांवर टीका करत मराठी अस्मितेच्या मुद्द्याला पाठिंबा दर्शवला.
हा मोर्चा केवळ मनसेच्या कार्यकर्त्यांपुरता मर्यादित राहिला नाही. स्थानिक मराठी कुटुंबे, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. काही ठिकाणी स्थानिकांनी मोर्च्यातील कार्यकर्त्यांना पाणी, फराळ आणि शुभेच्छा देत समर्थन दिले. “मराठी माणसाला त्याच्या गावातच परकं वाटावं, ही परिस्थिती बदलायला हवी,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
हा मोर्चा मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता. एका स्थानिक फेरीवाल्याला मराठी न बोलल्याने मनसे कार्यकर्त्याने मारहाण केल्याच्या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी ३ जुलै रोजी आंदोलन केले होते. याला प्रत्युत्तर म्हणून मनसे आणि ठाकरे गटाने एकत्र येऊन ८ जुलै रोजी हा मोकरणी मोर्चा आयोजित केला.
मीरा-भाईंदर परिसरात मराठी अस्मिता हा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. स्थानिक निवडणुका जवळ येत असताना या मोर्च्याने मनसे आणि ठाकरे गटाच्या एकजुटीची ताकद आणि मराठी मतदारांमधील प्रभाव दाखवून दिला आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, हा मोर्चा पुढील काळात मोठ्या राजकीय आंदोलनाची नांदी ठरू शकतो. मनसेने यापूर्वीही मराठी हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेतली असून, ठाकरे गटाच्या सहभागाने या लढ्याला नव्याने बळ मिळाले आहे.
Marathi e-Batmya