उच्च न्यायालयात याचिका, निवासी भागातील रेडी मिक्स्ड काँक्रिट प्लांट बंद करा गोवंडी, देवनार आणि चेंबूर भागातील वायू प्रदूषणाची पातळी चिंताजनक

मुंबईतील निवासी भागात कार्यरत रेडी मिक्स्ड काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या प्लांटमुळे गोवंडी, देवनार आणि चेंबूर भागातील वायू प्रदूषणाची पातळी खालावल्याचा आणि श्वसानाशी संबंधित आजार बळावल्याचा दावाही याचिकेत केला आहे.

अर्थ सेवाभावी संस्थेच्यावतीने उच्च न्यायालयात ही जनहित याचिका करण्यात आली असून प्रदुषणमुक्त, शुद्ध हवेत श्वास घेण्याचा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. तसेच या आरएमसी प्लांटमधून होणाऱ्या वायू प्रदूषणाचा लाखो रहिवाशांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे मेसर्स जेएसडब्ल्यू ग्रीन सिमेंट प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स श्री ललित नागपाल रेडी मिक्स्ड काँक्रीट प्लांट आणि मेसर्स देव इन्फ्रा या तीन कंपन्यांना त्यांचे आरएमसी प्लांट बंद करण्याचे आदेश द्यावेत आणि या कंपन्यांना निवासी भागात आरएमसी प्लांट चालवण्यापासून मनाई करण्याची मागणी याचिकेत केली आहे. कारण, हे आरएमसी प्लांट्स रुग्णालयाच्या २०० मीटर आणि निवासी भागाच्या १०० मीटरच्या आत आहेत. हे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) मार्गदर्शक तत्त्वांचे स्पष्टपणे उल्लंघन आहे. वायू प्रदुषणाविरोधात परिसरातील रहिवाशीयांनी गोवंडी रेसिडंट अँक्शन कमिटी अगेन्स्ट पोल्युशनची (जीआरएसीपी) स्थापन केली आहे. या जीआरएसीपीच्या सर्वेक्षणानुसार, जवळजवळ सर्व रहिवाशींयाना प्रदूषणामुळे खोकला, घशात खवखव, श्वास लागणे, मळमळ आणि डोकेदुखी यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या आरोग्यविषयक संकटामुळे तातडीने निवासी भागात बेकायदेशीरपणे कार्यरत आरएमसी प्लांट कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी याचिकेत केली आहे. लवकरच याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

याआधीही एका प्लांटमधून निर्माण होणाऱ्या गंभीर धूळ आणि प्रदूषणाबाबतची तक्रार येथील एका सोसायटीने एमपीसीबीकडे केली होती. तर आरएमसी प्लांटमुळे होणाऱ्या वायू प्रदुषणाबाबत याचिकाकर्त्या संस्थेने उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्या याचिकेची दखल घेऊन ७ नोव्हेंबर २०१६ रोजी, एमपीसीबीने मार्गदर्शक तत्त्वे बजावली. तर एमपीसीबीने केलेल्या तपासणीत या प्लांटमध्ये अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतरही प्लांट बंद करण्याचे आदेश असूनही, प्लांटमध्ये कथितरित्या बेकायदेशीरपणे काम सुरू होते. त्याविरोधातही रहिवाशांनी एमपीसीबीकडे आणखी तक्रारी मांडल्या. त्याची दखल घेऊन यानंतर आरएमसी प्लांटपैकी एक तात्पुरता बंद करण्यात आला. ज्यामुळे या परिसरातील हवेतील गुणवत्तेत सुधारणा झाल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.

About Editor

Check Also

पैलवान महेश घुले यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड ७२ वजनी गटातील कुस्ती स्पर्धेसाठी झाली निवड

अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कामगार कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *