माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात २०२२ मध्ये दाखल अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार, (अँट्रोसिटी) दाखल गुन्ह्याचा तपास स्वतंत्र यंत्रणे सोपावण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय महसूल अधिकारी (डीजीटीएस) समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात केली आहे.
कॉर्डेलिया क्रूझ अमलीपदार्थ प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबीचे मुंबई क्षेत्राचे माजी संचालक समीर वानखेडे नवाब मलिकचा जावई समीर खानलाही अटक केली होती. समीर खानच्या अटकेनंतर, नवाब मलिक यांनी समाजमाध्यम आणि वृत्तवाहिन्यांवर आपल्यासमवेत कुटुंबीयांची बदनामी आणि अपमान करण्याची मोहीम सुरू केली होती. नवाब मलिक यांनी आपल्या जातीलाही लक्ष्य केले, तसेच आपल्या जात प्रमाणपत्राच्या सत्यतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. परंतु, जात पडताळणी समितीने ९१ पानांच्या तपशीलवार अहवालात आपल्या दात प्रमाणपत्राला क्लिनचिट दिली होती. तथापि, समीर वानखेडे यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल करून नवाब मलिक यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
दुसरीकडे, अन्य एका मानहानीच्या दाव्यात उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना बदनामीकारक टिप्पणी करण्यास निर्बंध घातले असूनही, नवाब मलिक यांनी २७ ऑक्टोबर २०२४ रोजी आपल्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करून न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधावर तसेच आदेशाचेही उल्लंघन केले.
तपासात दिरंगाई करण्यासाठी नवाब मलिक यांनी पोलिसांवरही प्रभाव टाकल्याचा आरोपही समीर वानखेडे यांनी याचिकेत केला. गोरेगाव पोलिसांना अनेकदा स्मरणपत्रे देऊनही अँट्रोसिटी कायद्यांतर्गत गंभीर तरतुदींचा गुन्ह्यामध्ये समावेश केलेला नसल्याचा दावाही समीर वानखेडे यांनी केला. नवाब मलिक यांनी राजकीय ताकद, प्रभाव आणि पैशाच्या सामर्थ्याने पोलीस यंत्रणेवर नियंत्रण ठेवून विविध माध्यमांना उघडपणे मुलाखती देत आहेत. नवाब मलिक यांना कोणताही अंतरिम दिलासा नसतानाही ते मुक्तपणे निवडणूकीचा प्रचारात व्यग्र असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे या प्रकऱणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी समीर वानखेडे यांनी केली असून अँट्रोसिटी कायद्यांतर्गत आवश्यक तरतुदींचा गुन्ह्यामध्ये समावेश करून तपासाच्या प्रगतीचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश देण्याची मागणीही समीर वानखेडे यांनी न्यायालयाकडे केली आहे. या याचिकेवर २८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणातील पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे आपल्यासह कुटुंबीयांना नाहक मानसिक त्रास आणि अपमानाला सामोरे जावे लागत असल्याचा दावा समीर वानखेडे यांनी याचिकेतून केला. १४ ऑगस्ट २०२२ रोजी वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात नवाब मलिक यांच्याविरोधात अँट्रोसिटीतंर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, या प्रकरणी नवाब मलिक यांना अटक करण्यात आलेली नाही किंवा आजपर्यंत आरोपपत्रही दाखल केलेले नाही.
Marathi e-Batmya