कामगारांच्या मृत्यूला जबाबदार आमदार विकासकाला अटक का नाही? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांचा सवाल

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटना, पुणे येथील कार अपघात, डोंबिवली येथील बॉयलर दुर्घटना ताज्या असतानाच २४ मे रोजी भाजपाच्या एका आमदाराच्या कन्स्ट्रक्शन साइटवर दोन कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात येत नाही. गृहमंत्र्यांच्या जवळचे आमदार असल्याने कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

विद्या चव्हाण म्हणाल्या की, घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटना व त्यातील बेपर्वाई, पुणे येथील कार अपघात, डोंबिवली येथील बॉयलर दुर्घटना ताज्या असतानाच २०२३ फेब्रुवारी मध्ये बांधकाम साईटवर २ लहान मुलांचा लोखंडी एंगल पडून मृत्यू झाला, त्यानंतर फेब्रुवारी व आता २४ मे रोजी २२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मात्र भाजपा आमदाराच्या कन्स्ट्रक्शन साईटवरील या मृत्यूची दखल घेतली जात नाही तर गृहमंत्री पाठीशी असल्याने पोलिसांवर दबाव आणून ह्या मृत्युंना जबाबदार असणाऱ्यांना पाठीशी घालण्यात येत आहे, अशी टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्या की, ३०४ अ चा गुन्हा नोंदवला गेला, तो ही सुपरवाईजरवर, हा गंभीर गुन्हा असूनही यात अटक होत नाही. जामीन मिळतो व शिक्षा फार तर २ वर्षे, पण ३०४ कलम लावले तर १० वर्षाची शिक्षा होऊ शकते. या नरेंद्र मेहता व त्याचा ठेकेदार यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक झाली पाहिजे. मीरा भाईंदर येथे मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू आहेत. हजारो कामगार साईटवर काम करत असतात. ठाणे येथील कामगार विभाग अधिकाऱ्यांनी साईटवर कामगारांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना तिथे व्हिजिट देऊन त्याचा आढावा घ्यायला पाहिजे, पण घेतला जात नाही व गरीब कामगारांचा मृत्यू दडपून टाकण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी केला.

विद्या चव्हाण पुढे बोलताना म्हणाल्या की, निष्काळजीपणाचे आणखी किती बळी जाणार? बळी घेणारा आमदार सत्ताधारी भाजपाचा असल्याने गृहमंत्री त्यांना खुलेआम वाचवत आहेत. ‘विकास विकास’ म्हणत लोकांना मोहित केले जाते. पण ह्याच विकासकांच्या हलगर्जीपणामुळे अनेक वेळा बांधकाम साईटवर कामगारांचे बळी जातात. भाजपाचे आमदार व बिल्डर नरेंद्र मेहता व त्यांच्या परिवाराच्या सेवन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीचे मिरा भाईंदर येथे अपना – घर फेज-३ चे बांधकाम सुरू आहे. ठेकेदार महेंद्र कोठारी यांना आरोपी म्हणून अटक तर होत नाही, वर पोलिस हे सगळ दडपून टाकताना बघायला मिळते. हे गुन्हेगार उजळ माथ्याने फिरत तर आहेतच. उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी उत्तन येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आले असताना यांनी फडणविसांची भेटही घेतली असेही सांगितले.

शेवटी बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्या की, २४ मे रोजी तक्रार केल्यानंतर, ३०४ अ गुन्हा नोंदवला, तो बिल्डरवर किंवा ठेकेदारवर न नोंदवता सुपरवाईजर वर गुन्हा नोंदवला. बांधकाम साईटवर घेण्यात येणारी सुरक्षितता, न घेतल्याने असे वारंवार अपघात होतात. Stop Work ची नोटीस ही दिली गेली नाही. अशामुळे गरीब, कष्टकरी, मजुरांचे हकनाक जीव गमवावे लागत असल्याची शक्यताही यावेळी व्यक्त केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो २बीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई भूमीपूजन संपन्न मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्थेचे शहर बनविण्याचा संकल्प

मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर बनविण्याचा संकल्प असून मल्टी-मोडल इंटिग्रेशनच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *