अजित पवार यांची माहिती, कुंडमळा पूल दुर्घटना दुर्दैवी; मदत व बचावकार्याला सुरुवात दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असल्याचे सांगत या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

दुर्घटनेत काही नागरिक व पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, स्थानिक प्रशासनाने तात्काळ दुर्घटनास्थळी पोहचून बचाव आणि मदतकार्य सुरू केले. जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलही (NDRF) दुर्घटनेनंतर अल्पावधीतच घटनास्थळी पोचले असून त्यांनीही बचाव व मदतकार्यास सुरुवात केली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, “कुंडमळा येथे स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. जखमी नागरिकांना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्याचे निर्देशित देण्यात आले आहेत. या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशाराही यावेळी दिला.

शेवटी बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्य शासन या संकटाच्या काळात बाधित नागरिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, जखमींना आवश्यक ती वैद्यकीय मदत शासनामार्फत तातडीने दिली जाईल. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. आपण सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबतच्या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार

महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *