अजित पवार यांचा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर ? रोहित पवार, जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा

लोकसभा निवडणूकीच्या पूर्वीच अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही अशी चर्चा राज्यातील जनतेमध्ये होत होती. मात्र अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे एकमेव उमेदवार विजयी झाल्याने अजित पवार गटाची लाज राखली गेल्याचे बोलले जायला लागले. त्यातच अजित पवार यांचा होम टर्फवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची जागा निवडून आणता आली नाही. तर अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्या पक्षाच्या सोबत गेलेल्या निलेश लंके हे अहमदनगरच्या लोकसभा मतदारसंघातून निवडूणही आले. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षातील अनेक आमदार पुन्हा शरद पवार यांच्या पक्षाच्या संपर्कात येत असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार पक्षाचे रोहित पवार आणि जयंत पाटील यांनीही या चर्चेला दुजोरा दिला.

अजित पवारांचे १९ आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राजकीय खळबळ उडवून दिली.

बुधवारी, या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, अजित पवारांचे १९ आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या गटातील १२ आमदार हे भाजपाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. हे आमदार काय करतील हे पुढच्या काही दिवसात आपल्याला समजेल. पण या १९ आमदारांपैकी कोणाला आमच्या पक्षात घ्यायचे आणि कोणाला घ्यायचे नाही हा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील. आमचे शरद पवार यांना एकच सागणे आहे की, पक्षाच्या अडचणीच्या काळात जे लोक आपल्याबरोबर निष्ठेने राहिले त्यांनाच पहिले प्राधान्य द्यायला हवे. जे लोक स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष सोडून गेले त्या लोकांना, तसेच ज्यांना भाजपाने मारून-मुटकून अडचणीत आणून तिकडे नेलं असेल त्यांना दुसरे प्राधान्य द्यावे असे सर्व कार्यकर्त्यांना वाटते असे स्पष्ट केले.

युगेंद्र पवार यांना आगामी बारामती विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले जाणार का? या प्रश्वावर बोलताना रोहित पवार म्हणाले, कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाचं तिकीट नाकारायचे याचा निर्णय शरद पवार घेतात त्यामुळे हा प्रश्न शरद पवारांना विचारावा लागेल. पश्चिम महाराष्ट्रातील आमचे नेते बाळासाहेब पाटील, जयंत पाटील आणि संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे आमचे शरद पवार याबाबतचा निर्णय घेतील असे सांगितले.

दरम्यान, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, अजित पवार यांच्या पक्षातील अनेक आमदार पुन्हा एकदा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करू इच्छित आहेत. सध्या अशा संपर्कात असलेल्या आमदारांबाबत काहीही सांगता येणार नाही. तसेच या संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. परंतु अनेकांची इच्छा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आहे.

About Editor

Check Also

रामदास आठवले यांची घोषणा, मुंबईतील तालुका आणि वार्ड कमिटी बरखास्त येत्या ५ एप्रिल पर्यंत नवीन वॉर्ड तालुका कमिटी निवडण्यासाठी निवडणूक घेण्याचे आदेश

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुंबईतील रिपब्लिकन पक्षाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *