आकाश फुंडकर यांची माहिती, माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी नको नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणार

आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यात माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करून घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत लवकरच स्वतंत्र परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले.

माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या मालाची हाताळणी करून घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत केंद्रीय श्रम मंत्रालयाने ३० ऑगस्ट १९९९ रोजी दिलेल्या निर्देशांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामगार मंत्री ॲड फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

मंत्री ॲड. आकाश फुंडकर म्हणाले की, माथाडी कामगार आणि व्यापारी संघटनांमध्ये याबाबत कोणतेही मतभेद नाहीत. कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी टाळण्याबाबत व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. राज्यात माथाडी कामगारांकडून ५० किलोपर्यंतच वजनाची हाताळणी करण्याबाबत परिपत्रक काढले जाणार असून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. तसेच इतर राज्यांमध्येही या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी केंद्र सरकारशी समन्वय साधला जाईल.

पुढे बोलताना आकाश फुंडकर म्हणाले की, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या १५ एप्रिल २०२६ परिपत्रकानुसार नाशिक जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ (लासलगाव) यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, उपबाजार समित्या, व्यापारी संघटना, ट्रान्सपोर्ट व्यवसाय, बियाणे महामंडळ, वखार महामंडळ तसेच इतर संबंधित आस्थापनांना कोणत्याही उद्योग अथवा व्यवसायात ५० किलोपेक्षा अधिक वजनाची चढ-उतार किंवा हाताळणी कामगारांकडून करून घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कामगार विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याबाबतही कळविण्यात आले आहे. या निर्देशांच्या प्रभावी अंमलबजावणीची खबरदारी घेण्याच्या सूचनाही दिल्या.

बैठकीस माजी आमदार व माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते. कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन, कामगार विभागाचे आयुक्त डॉ एच.पी. तुम्मोड, तसेच संबंधित अधिकारी माथाडी कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, कर्जमाफी निव्वळ धुळफेक, ५० % पेक्षा जास्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार फडणवीस सरकारने आधी ८० लाख लाडक्या बहिणींना निकष लावून अपात्र ठरवले, आता शेतकऱ्यांचीही नियम लावून घोर फसवणूक

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना हा निव्वळ देखावा आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *