आशा स्वंयसेविका, गटप्रवर्तकांनी प्रस्तावित कामबंद आंदोलन स्थगित करा मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील आशा स्वंयसेविका आणि गटप्रवर्तक हे आरोग्य विभागाचा कणा असून कोरोना विरोधातील लढ्यात त्यांची भूमिका मोलाची असल्याने दिनांक २८ सप्टेंबर २०२० पासून प्रस्तावित असलेले कामबंद आंदोलन त्यांनी स्थगित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केले आहे.

शासननिर्णय निर्गमित लवकरच मोबदला मिळणार

मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, आशा स्वंयसेविकांना आणि गट प्रवर्तकांना प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यातील मंजूरीनुसार सेवांवर आधारित मोबदला मिळतो. त्यासोबत आशा स्वंयसेविकांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाने आशा स्वंयसेविकेस दरमहा २ हजार आणि गट प्रवर्तकांना दरमहा ३ हजार राज्य शासनाच्या निधीतून मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. तसा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे.  या निधीची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली आहे. या शासननिर्णयानुसार लवकरच त्यांना सर्व मोबदला मिळणार आहे.

केंद्र शासनाकडे मागणी

याबरोबरच प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात गटप्रवर्तकांचा जो मोबदला कमी करण्यात आला आहे त्या मोबदल्याची मागणी  नव्याने केंद्र शासनाकडे करण्यात येत आहे.

माझे कुटुंब- माझी जबाबदारी अभियानात काम करतांना जोपर्यंत कोविड झालेल्या रुग्णांचे लवकर निदान होत नाही तो पर्यंत कोविड विरोधातील लढाई आपण पुर्णपणे जिंकणार नाही. आपल्या मदतीनेच राज्यात “माझे कुटुंब- माझी जबाबदारी” हे अभियान  राबविण्यास सुरुवात झाली आहे.  याकरिता आपणास केंद्र शासनाने दरमहा मंजूर केलेल्या  १ हजार रुपयांव्यतिरिक्त दररोज १५० रुपये इतका मोबदला अदा करण्यात येणार आहे.  तसेच याकामी सोबतीला मदतीसाठी एक स्वंयसेवक देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेतांना आपणास सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज, सारखे संरक्षण साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे.

मोहिमेतील माहिती संकलित करण्यासाठी व ती भरणे सोयीचे व्हावे यासाठी ॲप तयार करण्यात आले आहे. ॲपमध्ये माहिती भरतांना काही अडचणी आल्यास उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रपत्रात लेखी स्वरूपात माहिती भरण्याची मुभा देखील आपणास दिली आहे असे ही मुख्यमंत्र्यांनी आशा स्वंयसेविका आणि गट प्रवर्तकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

कोरोना नियंत्रणात आशा स्वंयसेविकांचा अमुल्य वाटा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात आशा स्वंयसेविका योजनेची अंमलबजावणी सुरु असून राज्यात ग्रामीण आणि शहरी भागात मिळून ६६ हजारांहून अधिक आशा स्वंयसेविका तर ४ हजार गटप्रवर्तक काम करत आहेत. आशा स्वंयसेविका योजनेमुळे राज्यातील नवजात बालकांचे मृत्यू, बालमृत्यू व माता मृत्यू कमी करण्यात मोलाची मदत मिळाली आहे. कोविड १९ या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवतांना देखील त्यांची खुप मदत होत आहे. आशा स्वंयसेविकांनी कोविड प्रादुर्भावाच्या काळात प्रत्येक घराला भेट देऊन,कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करून नियंत्रण मिळवण्यात अमुल्य वाटा उचलला आहे असेही मुख्यमंत्री या पत्रात आवर्जुन म्हणतात.

 

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पंतप्रधान मोदी पनौती तर मुख्यमंत्री फडणवीस खोटारडे, पेट्रोल डिझेल आहे तर पंपावर रांगा कशासाठी ? पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचे दादरमध्ये मोठे आंदोलन व रास्ता रोको

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी LPG व सीएनजी मध्ये भरमसाठ दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *