Breaking News

… पण महायुतीत अजित पवार यांना बाजूला काढण्याच्या प्रयत्नात शिंदे आणि भाजपा एकत्रित विधानसभेला सामोरे जाणार

राज्यातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होण्यास आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीनंतर निवडणूकीच्या प्रत्यक्ष हालचाली सुरु होतील असे सांगत निवडणूकीला महायुती म्हणूनच सामोरे जाणार असल्याचे सांगत आहेत. मात्र प्रत्यभात या महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेला अजित पवार यांच्या महाराष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला करण्याच्या हालचाली भाजपा आणि अन्य नेत्यांकडून युद्ध पातळीवर सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला फोडण्यासाठी जंगजंग पछाडले. मात्र काही केल्या राष्ट्रवादी काँग्रेस फुटतच नव्हती. अखेर अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाहेर काढताच पुढील २४ ते ४८ तासात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपाला अपेक्षित असलेली राजकिय फुट पडली आणि शिवसेना फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादीही फुटली. त्यावेळी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मी परत आलो पण येताना दोन पक्ष फोडून परत आल्याचे जाहिरपण सांगायला सुरुवात केली.

त्यातच भाजपाला मानणारा जो व्यावसायिक आणि उच्चभ्रु जातीय असलेला वर्गाने नाराजी दाखविण्यास सुरुवात केली. यातील काही जणांनी तर इतरांनी खाजगीत याबद्दलची नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. तसेच भाजपाचे निष्ठावंतही या महायुती नामक अजित पवार यांच्या सोबतीच्या विरोधात गेल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे अजित पवार यांना सोबत घेण्याऐवजी नैसर्गिक युतीत राहिलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाच फक्त सोबत घेऊन राज्य कारभार हाकण्यात काय अडचणी होती असा सवाल उपस्थित करण्यास सुरुवात केली. ज्या अजित पवार यांच्यावर आरोप केले त्यांनाच सत्तेत सहभागी करून घेत त्यांच्या पक्षाला आणि अजित पवारांना मानाची खाती दिल्यावरून भाजपा समर्थक आमदार आणि मतदारांमधील नाराजी आणखीनच वाढली.

अजित पवार यांच्याबरोबरील अनैसर्गिक युतीचा फटका काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत झाल्याची चर्चा आजही भाजपामध्ये मोठ्या चवीनं चर्चिली जाते. तसेच एकाबाजूला राज्य सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा अंतिम शब्द असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र राज्य सरकारमध्ये अंतिम शब्द दिल्लीहून येतो आणि तोच अंतिम होत असल्याचे आतापर्यंत सिद्ध होत आले आहे. तसेच भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्ये अद्यापही अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना जवळ घ्यायला तयार नाहीत. त्यातच अजित पवार यांनीही नेहमीच भाजपाचे दिल्लीतील अमित शाह आणि जे पी नड्डा मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्यापासून दोन हात लांब असल्याचा दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्यामुळे अजित पवार हे भाजपासोबत असून सुद्धा ताकाला जाऊन भांड लपविण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे मध्यंतरी शिंदे गटाच्या एका मंत्र्याने अजित पवार यांचे थेट नाव घेत टीका केलेली असतानाही त्यावर ना मुख्यमंत्री शिंदे काही बोलले ना भाजपाचे नेते काही बोलले. उलट अजित पवार यांनी त्या मंत्र्यांच्या मतदारसंघात असलेल्या कार्यक्रमाला जाणेच नापसंत केले.

या सगळ्या घटनांमागे अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठीच या गोष्टी जाणीवपूर्वक करण्यात येत असल्याची चर्चा मंत्रालयीन आणि भाजपा पदाधिकाऱ्यांच्या गोटात सुरु आहे. तसेच महायुतीला काहीही करून पराभूत करण्याचा चंग महाविकास आघाडीने बांधला असून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपाच्या विरोधकांना एकत्रित कऱण्याचे काम चांगलेच सुरु आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला खुष कऱण्यासाठी लाडकी बहिण योजना, तीर्थयात्रा, वयोश्री योजनेच्या माध्यमातून थेट जनतेला लाभ देत खुष कऱण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्यक्षात जनतेत मात्र नाराजीच असल्याचे दिसून येत असल्याने अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढत महाविकास आघाडीला ही विधानसभा निवडणूकीत वेगवेगळे लढविण्यासाठी मजबूर करायचे अशी खेळी भाजपाकडून आखण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत