डॉ स्वामीनाथन यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या शब्दात वाहिली आदरांजली स्वामीनाथन यांच्या निधनाने शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेला सुपुत्र गमावला

‘भारताला कृषी क्षेत्रात आत्मसन्मान मिळवून देणारा. कोट्यवधींच्या अन्नसुरक्षेची काळजी वाहणारा. शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी आयुष्य वाहून घेतलेला महान सुपुत्र आज भारत मातेने गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्मविभूषण, ज्येष्ठ वैज्ञानिक, कृषितज्ज्ञ डॉ एम एस स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

डॉ स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, भारताची कृषी क्षेत्रातील, मृद व जलसंधारण क्षेत्रातील प्रगती ही डॉ स्वामीनाथन यांच्या अखंड साधनेचे फलित आहे. त्यांच्या संशोधनाच्या आधारावर भारताने अन्नधान्य स्वयंपूर्णता प्राप्त केली. डॉ. स्वामीनाथन यांनी शेतमजूर, शेतकरी ते कार्पोरेट फार्मिंग याविषयी मांडणी केली. भारतीय हरितक्रांतीचे जनक हे बिरूद त्यांनी अखंडपणे एक व्रत म्हणून सांभाळले. जागतिक स्तरावर डॉ. स्वामीनाथन हे आपल्या भारतीयांची एक महान बौद्धिक संपदा म्हणून पाहिले जात होते. अशा या भारतमातेच्या महान सुपुत्राचे निधन देशाचे मोठे नुकसान आहे.

शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत संशोधन पोहोचविणारा, भारताच्या हरितक्रांतीचा जनक हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

भारताला अन्न-धान्याच्याबाबतीत स्वयंपूर्ण करण्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा सिंहाचा वाटा आहे. भारताच्या कपाळावरचा अन्न-धान्य टंचाईचा कलंक पुसून देशातील गरीब शेतकऱ्यांना संकरित बियाण्यांच्या माध्यमातून अधिक उत्पादनाचा मूलमंत्र त्यांनी दिला. त्यांच्या निधनाने देशाच्या पहिल्या हरितक्रांतीचा जनक हरपला आहे, अशा शोकभावना व्यक्त करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, डॉ स्वामिनाथन यांनी भारतातील अल्पभूधारक, कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित वाणांचा शोध लावला. या संकरित वाणांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या पहिल्या हरितक्रांतीत अल्पभूधारक शेतकऱ्यांना देखील सहभागी करुन घेतले. तामिळनाडूमधील तंजावर जिल्ह्यात जन्मलेल्या डॉ स्वामीनाथन यांचा सुरुवातीपासूनचं कृषी क्षेत्राकडे विशेष ओढा होता. त्यामुळे आयुष्यात आलेल्या अनेक संधी सोडून कृषी क्षेत्रातील मूलभूत संशोधनात त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. बटाटा, गहू, तांदूळ आणि तागावर संशोधन करुन अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित वाणांचा त्यांनी शोध लावला. केवळ संकरित वाणांची निर्मिती करून ते थांबले नाहीत तर सामान्य शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत त्यांनी संशोधन पोहोचवले. देशाच्या पहिल्या ‘हरितक्रांती’ कार्यक्रमात त्यांनी देशातील अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यालाही जोडले. या हरितक्रांतीने भारताला जगातील अन्नटंचाई असलेला देश या कलंकातून मुक्तता मिळाली. त्यांचे निधन ही भारतीय कृषी क्षेत्राची मोठी हानी आहे. देशाच्या पहिल्या हरितक्रांतीच्या प्रणेत्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ स्वामिनाथन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *