मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, कृषि विद्यापीठांनी उत्पादन वाढीसाठी एआय मॉडेल तयार करा संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या ५३ व्या बैठकीचे उद्घाटन

शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. राज्यातील कृषि विद्यापिठांनी प्रमुख पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापराचे मॉडेल तयार करण्याबाबत संशोधन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वातावरणीय बदल, कीड व्यवस्थापन, तसेच पावसाचा खंड पडल्यानंतरही तग धरू शकणारे वाण शेतकरी बांधवांना उपलब्ध देण्याबाबतचे संशोधन अपेक्षित असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्यावतीने आयोजित संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या ५३ व्या बैठकीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार संजय जाधव, आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, राहुल पाटील, रत्नाकर गुट्टे, राजेश विटेकर यांच्यासह कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषि आयुक्त सुरज मांढरे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. इंन्द्र मणि, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, संशोधक संचालक डॉ. खिजर बेग, डॉ. किशोर शिंदे उपस्थित होते. प्रारंभी स्वर्गीय वसंतराव नाईक, महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र शासनाने राज्यात आयसीआरच्या माध्यमातून सुरु केलेल्या नव्या योजनेत शेतीशी सबंधित विविध शास्त्रज्ञ, या क्षेत्रात कार्यरत संस्था, अधिकारी एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाणार आहेत. संशोधक आणि शेतकरी यांच्यामध्ये या माध्यमातून एक नवीन नाते निर्माण होईल. या अंतर्गत पुढील पंधरा ते वीस दिवस एकात्मिक कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येत असून, या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रापासून होत आहे ही महत्त्वाची बाब आहे. या माध्यमातून संशोधक एका दिवशी तीन ते चार गावांमध्ये जातील व शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद साधतील. या संवादातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शेती क्षेत्राच्या विकासासाठी हाती घेतलेला हा उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुखमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वातावरणीय बदलामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने उभा राहिली आहेत. बदलत्या तंत्राचा वापर करत गुंतवणूक आधारित शेती आपल्याला करावी लागणार आहे. संरक्षित शेतीसाठी शेतीमध्ये गुंतवणूक वाढवावी लागेल. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. वातावरणीय बदलामुळे निर्माण होणाऱ्या पावसातील खंड सारख्या संकटात तग धरू शकेल, असे वाण विकसित करावे लागणार आहेत. पावसाचा खंड, कीड व्यवस्थापन, वातावरणीय बदलात पावसाचा खंड आदी संकटात तग धरू शकणारे वाण विकसित करण्यासाठी कृषि विद्यापीठांमध्ये संशोधन होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

शेवटी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला कामे करावे लागेल तसेच शेती क्षेत्रात संशोधन करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि विद्यापीठांनी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. हा वापर वाढविण्यासाठी कृषि विद्यापीठांनी ‘मिशन कृत्रिम बुद्धिमत्ता’ सुरु करावे. या माध्यमातून प्रमुख पिकांच्या उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे नवे मॉडेल विकसित करावे. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याचेही सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रगतीत कृषि विद्यापीठाचे योगदान मोठे – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शेतकऱ्यांच्या प्रगतीत कृषि विद्यापीठाचे योगदान मोठे आहे. शेतकरी बांधवांना विकसित वाण मिळण्यासाठी कृषि विद्यापिठांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, त्यासाठी तीन दिवस चालणारी संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास समिती परिषद महत्त्वाची ठरणार आहे. राज्यातील शेतकरीही विद्यापिठाच्या बरोबरीने प्रयोग करतो आहे, अशा शेतकरी बांधवांना विद्यापीठांनी सोबत घेऊन काम करावे. केंद्र शासनाने एक दिवस बळीराजासोबत हा उप्रकम सुरू केला असून राज्य शासनाने या उप्रकमात सक्रीय सहभाग घेतला आहे, असे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

महाराष्ट्र शेती क्षेत्रात पथदर्शी काम करेल – राज्यमंत्री आशिष जयस्वाल

भविष्यातील कृषि क्षेत्राची दिशा व शेतकऱ्यांसाठी किफायतशीर वाण विकसित करण्याबाबत संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास समिती परिषदेत मंथन होईल. राज्यातील शेती व शेतकरी यांच्या प्रगतीचा वेग अधिक वाढविण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल. शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर  महत्त्वाचा आहे. आगामी पाच वर्षात महाराष्ट्र शेती क्षेत्रात नक्कीच पथदर्शी काम करेल, असा विश्वास राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला.

यावेळी राज्यातील चारही कृषि विद्यापिठांच्या स्मरणिका व विविध कृषि विद्यापीठांच्या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.

उत्कृष्ट कृषि संशोधन पुरस्कार-२०२५ पुरस्काराने गौरव

राज्यातील चारही कृषि विद्यापीठांच्या उत्कृष्ट कृषि संशोधन शास्त्रज्ञांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाचे डॉ. मदन पेंडके, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे डॉ. संतोष गहुकर, बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठाचे डॉ. विजय दळवी, महात्मा फुले कृषि विद्यापिठाचे डॉ. सुनील कदम यांचा उत्कृष्ट कृषि संशोधन पुरस्कार-२०२५ देवून गौरव करण्यात आला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे ई-भुमिपुजन

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रस्तावित नविन इमारतीचे ई-भूमिपुजन करण्यात आले.

महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग यांच्या शासन निर्णयानुसार १०० विद्यार्थी क्षमतेचे प्रवेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी येथे सुरु करण्यात आले आहे. या संस्थेकरिता शासनाकडून गंगाखेड रोड वरील ब्राम्हणगाव व ब्रम्हपुरी या गावाच्या शिवारात एकूण २०.०० हेक्टर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या जागेवर ४३० खाटांचे रुग्णालय व १०० विद्यार्थी क्षमतेचे एम.बी.बी.एस महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. तसेच हे महाविद्यालय व रुग्णालयासाठी लागणारे हॉस्टेल, डॉक्टरांना राहण्यासाठी निवासस्थान, गेस्टहाऊस बांधण्यात येणार आहे. या बांधकामासाठी ४०३.९८ कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर केले आहेत.

सेलू उपकेंद्राचे ई-भूमीपूजन

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते १३२/३३ के.व्ही. सेलू उपकेंद्राचे ई-भूमीपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे सेलू तालुक्यातील जिनिंग, प्रेसिंग, हातमाग उद्योग व सेलू औद्योगिक क्षेत्रातील अस्तित्वात असलेले तसेच भविष्यात येणाऱ्या उद्योगांसाठी योग्य  दाबाने व अखंडित वीज पुरवठा करणे सहज शक्य होणार आहे. या बरोबरच सेलु तालुक्यातील शेतकरी व वीज ग्राहकांना फायदा होणार आहे.

About Editor

Check Also

नरहरी झिरवाळ यांची माहिती, ‘ब्लिंकइट’द्वारे कालबाह्य अन्न वितरण प्रकरणात कंपनीवर कारवाई विधानसभेत भीमराव तापकीर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना माहिती

पुणे शहरात ब्लिंकइट या ऑनलाईन अन्न वितरण सेवेच्या माध्यमातून कालबाह्य खाद्य पदार्थांचे वितरण होत असल्याबाबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *