मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, संकटकाळात शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी मुख्यमंत्र सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले शेती पिकांचे, जनावरांचे, घरांचे व व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झाले असून राज्य शासन संकटकाळात पूरग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पूरग्रस्त नागरिकांनी अशा संकटाच्या काळात धीर धरावा, असे आवाहनही केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना या गावाला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली, त्यांनी दोन्ही गावातील नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अतिवृष्टी व पूर आल्यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्वांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापुढेही पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत देण्यात येणार आहे. टंचाई काळात ज्या निकषाप्रमाणे मदत करण्यात येते त्याप्रमाणेच अतिवृष्टी, ओल्या दुष्काळातही मदत केली जाईल,  असे सांगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दारफळ गावात पुरामुळे मोठे  नुकसान झाले असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नदीने पात्र बदलले आणि  गावाचा मोठा भाग पाण्यात गेला, तसेच ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे घरांचे, अन्नधान्याचे, शेती, जनावरांचे नुकसान झाले आहे. शेती, घरादारांकरिता, अन्नधान्य आदींसाठी शासन मदत करणार असून रस्ते, शाळा, शेतरस्ते, वीजव्यवस्था आदी सुविधांसाठीही आवश्यक ती सर्व मदत करणार आहे. व्यावसायिकांनाही नुकसानीलाही स्वतंत्र मदत करण्यात येईल, असे सांगितले.

दौऱ्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा तालुक्यातील निमगाव येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. या संकटातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना आवश्यक मदत करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *