मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, गडचिरोलीत पाच हजार कुटूंबासाठी ‘उपजिविका विकास कार्यक्रम’ आकांक्षित तालुक्यांचे होणार सक्षमीकरण

गडचिरोली जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून ‘उपजिविका विकास कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ४९ गावांचा समावेश असून यात अ‍ॅक्सिस बँक फाउंडेशनचा सक्रीय सहभाग असणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून हा प्रकल्प राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमासाठी आगामी तीन वर्षासाठी २०.३४ कोटी रूपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून पाच हजार लाभार्थी कुटुंबांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिकांचे जीवनमान उंचावणे आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी देण्यास शासन प्राधान्य देत आहे. शासनाच्या या धोरणाला प्रतिसाद देत अ‍ॅक्सिस बँक फाउंडेशनच्या सक्रिय सहभागातून गडचिरोलीत उपजिविका विकास कार्यक्रमांतर्गत काम सुरू झाले आहे. हवामानाशी सुसंगत शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन, उपजिविकेत सुधारणा करणे, नागरिकांचे जीवनमान उंचावून समुदायाचे कल्याण साधणे हे प्रमुख उद्दिष्टे या प्रकल्पात पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी मुख्य उपक्रमांतर्गत शेती आधारित उपजिविका, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, शेतीतर उपजिविका हस्तक्षेप, सामूहिक उद्योजकता, आरोग्य आणि पोषण या बाबींवर लक्ष देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ३० जून २०२५ पर्यंत या उपक्रमात २,००० कुटुंबांची नोंदणी झाली आहे. एकूण ६६ बोडींचे गाळमुक्तीकरण करून त्यांच्या जलधारण क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. बोडी आधारित शेती प्रणालीत माशांचे संगोपन, त्यावर कुक्कुटपालन आणि त्याच पाण्याचा वापर पिकांना दिला जातो. ही पद्धत शेती उत्पादकतेत वाढ करुन ग्रामीण कुटुंबांसाठी उत्पन्नाचे विविध मार्ग उपलब्ध करून देत असल्याचेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २०२७-२८ पर्यंत या प्रकल्पांद्वारे सहभागी कुटुंबांना लाभ होईल. त्यांच्या मूळ उत्पन्नाच्या तुलनेत उत्पन्न दुगुणी होईल. तसेच शेती उत्पादकता वाढवून उपजिविकेच्या संधी उपलब्ध होतील. शेतकरी गटांच्या माध्यमांतून सामूहिक खरेदी-विक्री व्यवस्था निर्माण होईल, तसेच पोषण आणि आरोग्य विषयक जनजागृतीमुळे जीवनमानात लक्षणीय सुधारणा होण्यासही सुरुवात होईल अशी आशाही यावेळी केली.

About Editor

Check Also

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती

महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *