उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सार्वजनिक जीवनातील माहिती माहित आहे का? अजित पवार यांच्या पत्नी म्हणूनच नाही तर त्यांची स्वतःचीही ओळख

राज्याचे मुख्यमंत्री पदावर असताना शरद पवार असताना त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि धाराशिव अर्थात उस्मानाबादचे आमदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी म्हणजे सुनेत्रा पाटील या होय. मात्र कालांतराने शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांचा विवाह हा सुनेत्रा पाटील यांच्याशी झाला. त्यामुळे पद्मसिंह पाटील आणि शरद पवार हे तसे नातेवाईक. तसेच सुनेत्रा पवार यांनी यांची ओळख ही फक्त डॉ पद्मसिंह पाटील यांची भगिनी आणि अजित पवार यांची पत्नी ऐवढीच ओळख सुनेत्रा पवार यांची नाही.

तर धाराशिव आणि बारामतीत सुनेत्रा पवार यांची स्वतःची सार्वजनिक जीवनात ओळख स्थापित केली आहे. त्यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याची ओळख खालीलप्रमाणे आहे.

सुनेत्रा अजित पवार- सविस्तर माहिती

सुनेत्रावहिनी पवार यांचे माहेर धाराशिव जिल्ह्यातील संत गोरोबाकाकांची पावन भूमी असलेले तेर गाव. वडील मराठवाडा मुक्तीसंग्रामात स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचे बंधू माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे दीर्घकालीन राजकारण, हे त्यांनी लहानपणापासूनच जवळून पाहिले. त्यामुळे समाजकारण आणि राजकारणाचे बाळकडू त्यांना आपोआपच प्राप्त झाले.

अर्थशास्त्राची पदवी (बी. कॉम.) घेतलेल्या खा. सुनेत्रावहिनी शिक्षणासोबत तेव्हापासूनच अनेक कलागुणांत पारंगत होत्या. विशेषत: पेंटींग, संगीत, फोटोग्राफी आणि शेती हे त्यांचे विशेष आवडीचे विषय आहेत. त्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईच्या नेहरू सेंटरमध्येही झाले आहे.
लग्नानंतर त्या काटेवाडीतील शेतीत रमल्या. प्रसंगी स्वतः शेतात राबायला सुरुवात केली. त्यावेळी काटेवाडी, कण्हेरीतील कष्टकरी वर्गाशी त्यांचा संपर्क आला. तात्यासाहेबांची सून आणि अजितदादांची बायको आपल्यासोबत स्वतः शेतात उभी राहते याचे इतरांना आश्चर्य वाटले नसते तरच नवल. मात्र, जे काही करायचं ते मन लावून करायचं. एखादी गोष्ट स्वीकारली तर ती तडीस न्यायची, या स्वभावाने त्यांनी काटेवाडीची शेती स्वतःच्या घामाने फुलवली.

केवळ शेतीच नाही तर आधीची दहा हजार पक्षांची पोल्ट्री त्यांनी एक लाखावर नेली.

दादांनी सुरु केलेल्या शारदा दूध डेअरीत देखील लक्ष घालून दूध संकलन वाढवले.

लग्नानंतर ५ वर्षात अजितदादांचे राजकारण विस्तारत गेले आणि साहजिकच संपूर्ण जबाबदारी सुनेत्रावहिनींवर येऊन पडली. त्यांनीही ती आनंदाने आणि समर्थपणे पार पाडली.

१९९१ साली अजितदादा खासदार झाले आणि त्यानंतर अवघ्या तीनच महिन्यात आमदार झाले. मंत्रीही झाले. साहजिकच सुनेत्रावहिनींचे वास्तव्याचे ठिकाण मुंबई झाले.

दरम्यानच्या काळात विद्या प्रतिष्ठानची विद्यानगरी उभारणीवेळी अजितदादा बऱ्याचदा रुईच्या माळरानावर ठाण मांडून असायचे. त्यावेळी अजितदादांचा दुपारचा जेवणाचा डबा घेऊन सुनेत्रावहिनी यायच्या आणि त्याही या उभारणीच्या कामाच्या साक्षीदार व्हायच्या.

त्यावेळी त्यांचा रुई व परिसरातील जनतेशी जवळून संपर्क आला. पुढे नंतर त्या विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त झाल्या असल्या तरी विद्यानगरी उभारणीच्या कामात त्या पहिल्यापासून सहभागी आहेत.

राज्य शासनाच्या स्वच्छता अभियानात मोलाचा सहभाग घेवून स्वत:चे गाव काटेवाडी राज्यात सर्वप्रथम आणले. सोबतच त्यांनी निर्मल ग्रामची चळवळ यशस्वी करण्यात मोठा सहभाग नोंदवला.

विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त होण्याआधीपासून या संस्थेच्या कामात त्या सक्रिय राहिल्या. याचे कारण म्हणजे पवारसाहेब आणि अजितदादा हे राज्याच्या राजकारणात व्यस्त झाल्याने सुनेत्रावहिनींना विद्या प्रतिष्ठानच्या प्रत्येक बाबीत लक्ष घालावे लागले. कोणतेही पद नसताना या संस्थेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान त्या देत आल्या आहेत.

पुढे विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्य, त्यानंतर याच विद्यापिठाच्या सिनेट सदस्यपदी त्यांना संधी मिळाली. या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या.

सन २००२ पर्यंत त्यांच्या काटेवाडी गावातील चित्र विदारक असेच होते. गावात घाणीमुळे आणि परिपूर्ण आरोग्य सेवेची सोयच नसल्याने गावात अनारोग्याचे वातावरण होते. त्यामुळे अनेक दुखण्यांनी आजारी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती.

अशा परिस्थितीत सुनेत्रावहिनींनी ग्रामस्थांमध्ये आत्मविश्वासाचे बीज पेरून ग्रामविकासाची चळवळ सुरु केली. त्यांनी हाती घेतलेल्या ग्रामविकासाच्या कामातून काटेवाडी निर्मलग्राम, यशवंतग्राम, तंटामुक्तग्राम, विमाग्राम, देशातील पहिले सायबरग्राम, कृषिग्राम आणि पर्यावरणग्राम झाले. पुढे ग्रामपंचायतसह, प्राथमिक शाळा, अंगणवाडीला आय.एस.ओ. मानांकन देखील मिळाले. गावच्या दोन महिला सरपंचांचा आदर्श सरपंच पुरस्काराने गौरव, शिक्षकांचा राष्ट्रपती पुरस्काराने गौरव, या अभियानातून प्रेरणा आणि बळ मिळाल्याने कृषिविकास झाल्याने शेतकऱ्यांचा तसेच शैक्षणिक विकास झाल्याने विद्यार्थ्यांचा विविध पातळीवर गौरव झाला.

शैक्षणिक विकासासाठी सुनेत्रावहिनींनी ’शाळा प्रवेश उत्सव दिन’ उपक्रम सुरू केला, जो पुढे राज्य सरकारचा अधिकृत कार्यक्रम झाला. गाव हागणदारीमुक्त करताना त्यांनी घेतलेली भूमिका पुढे संपूर्ण राज्यात ’गुड मॉर्निंग पथक’ या नावाने स्विकारली गेली. त्यांनी राबवलेले असे इतरही उपक्रम पुढे संपूर्ण राज्याला दिशादर्शक ठरले.

पिण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेत फिल्टर प्लँट बसवणारी आणि भूमिगत गटार योजना राबवणारी काटेवाडी पहिली ग्रामपंचायत ठरली. ’झीरो बॅलन्स अकाउंट’ची ’जनधन योजना’ 2014 नंतर आली; मात्र त्यापूर्वीच सात वर्षांपूर्वी काटेवाडीत राष्ट्रीयीकृत बँकेशी सामंजस्य करार करून ’झीरो बॅलन्स’ची अनेक बँक खाती उघडली गेली. बँक सुविधा केंद्राची देशाला देणगी दिली ती काटेवाडीने आणि काठेवाडी भारतात प्रथमच वाय मॅक्सच्या माध्यमातून महा ई -सेवा केंद्रांचा प्रारंभ झाला तो काटेवाडीतून. याची दखल घेवून या विविध उपक्रमास आंतरराष्ट्रीय पातळीवरील जागतिक बँक व सार्क देशाच्या विविध अधिकारी-पदाधिकाऱ्यांना भेटी दिल्या.

चूल, मूल आणि शेत एवढ्याच परिघात असणाऱ्या महिलांना संघटित करून त्यांच्यातील ’स्वत्व’ जागृत केले. त्यांना या चळवळीत सक्रिय केले. ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद करून घरांवर महिलांची मालकी निर्माण केली. घराच्या दारावर महिलांच्याही नावाच्या पाट्या लावल्या, ज्यामुळे खऱ्या अर्थाने तमाम महिलांना ’मालकीन’ केले ते काटेवाडीतील याच चळवळीने. सुनेत्रावहिनींच्या प्रयत्नातून काटेवाडीत एकजुटीची भावना निर्माण झाली. त्यातून गावाचा चेहरामोहरा बदललाच, शिवाय ग्रामस्थांच्या आर्थिक जीवनातही परिवर्तन झाले. त्यातून विकसित झालेली काटेवाडी सुजलाम-सुफलाम आणि समृद्ध झाली. असे अनेक रोलमॉडेल उपक्रम वहिनींनी यशस्वीरित्या राबविले.

सुनेत्रावहिनींनी अजितदादांच्या पत्नी म्हणून असणाऱ्या लौकिकातून ’जादूची कांडी फिरवली’ आणि हा अफाट बदल झाला, असं बिलकूल झालं नाही. किंबहुना, इतर आदर्श ठरलेल्या गावांपेक्षाही काकणभर अधिकच कष्ट घेत, प्रसंगी प्रचंड मोठी खडतर वाट त्यांना चालावी लागली. त्या आल्या, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी गाव बदलून टाकलं, असं हे एका रात्रीत चित्र बदललं नाही. तर, अफाट मेहनत, जिद्द आणि ’काटेवाडीच्या विकासाचा’ ध्यास हाच आपला श्वास’ करून, सर्वांना सोबत घेऊन एकजुटीने त्यांनी हा कायापालट घडवून आणला. त्यांच्या या कामाचा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान झालाच शिवाय अनेक राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय मान, सन्मान त्यांना प्राप्त झाले. दादांच्या सामाजिक, राजकीय निर्णय प्रक्रियेत त्यांनी दादांना खंबीर साथ दिली .

या कामातील यशानंतर त्यांचे कार्य काटेवाडीच्या सीमा ओलांडून विकासाच्या विविध क्षेत्रात विस्तारलं. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बारामती तालुक्यात सामाजिक उपक्रमांची एक मालिकाच निर्माण झाली. निर्मलग्राम, जलसंधारण, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण अशा इतरही क्षेत्रांना त्यांनी गवसणी घातली. ज्या कामाला त्यांचा हात लागेल त्या कामाचे सोने होत गेले. मग ते एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया असो, बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क असो, कृषी उद्योग मूल संस्था असो, कै. रघुनाथ गेनबा बोरावके चॅरिटेबल ट्रस्ट असो, की विद्या प्रतिष्ठान असो. आज एकट्या बारामती टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या 6 हजार महिलांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.

बारामती तालुक्यात लाखो झाडं लावली, जगवली.

लाखो लिटर पाणी अडवण्याचे काम जलसंधारणाच्या विविध कामांतून झाले.

गरजू रुग्णांच्या डोळ्यांचे ऑपरेशन असो, की कॅन्सर, हृदयरोग, मिरगी प्लास्टिक सर्जरी सारख्या गंभीर आजारांसह विविध आजारांचे तपासणी व मोफत उपचार शिबिरे असोत. त्यांनी बारामतीत राबविलेल्या अशा महाआरोग्य शिबिरांमधून दिलासा मिळालेल्या रुग्णांची संख्या लाखांच्या घरात आहे.

भावी पिढीच्या शिक्षणाची काळजी घेत शैक्षणिक क्षेत्रात दीपस्तंभ ठरणारे उपक्रम त्यांनी राबविले. मग तो शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रम असो, मातीतील खेळांची जत्रा असो, की विज्ञान जत्रा व प्रदर्शन असो.

कृषी विकासात काम करताना अनेक कामांत महत्त्वपूर्ण ठरले ती त्यांनी स्थापन केलेली महाराष्ट्र स्टेट अ‍ॅग्री अँड रुरल टुरिझम फेडरेशन (मार्ट) या संस्थेची स्थापना. शेतकऱ्याला हायटेक करताना कृषी विकासाच्या अनेक संधी त्यांनी निर्माण केल्या. हजारो महिलांना सक्षम करताना काटेवाडीसह विविध ठिकाणच्या युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यात त्या योगदान देत आल्या आहेत.

ग्रामीण भागातील युवक उद्योजक व्हावा या हेतूने आंतरराष्ट्रीय ग्रामीण उद्योजकता शिबिराचे आयोजन त्यांनी केले. या कामाची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली. त्यातून त्यांना वर्ल्ड आंत्रप्रिनरशिप फोरमच्या सिंगापूर, फ्रान्स येथील कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली.

प्लास्टिक मुक्तीची हाक असो, की आरोग्य संवर्धनाचा जागर असो. प्रतिबिंब, मृदगंध सारखे उपक्रम असोत, की कला, क्रीडा क्षेत्राला बळ देण्याची तळमळ असो. अशा असंख्य उपक्रमांना पाठबळ देऊन, स्वतः पुढाकार घेत त्याचे आयोजन करून बारामतीला या क्षेत्रात स्वतःचा चेहरा देण्याचे काम केले ते सुनेत्रावहिनी पवार यांनी.

सुनेत्रावहिनी पवार काटेवाडी, बारामतीशी एकरूप झाल्या त्याला ४१ वर्ष झाली. एवढ्या वर्षात त्यांनी आदणीय पवारसाहेब, सुप्रियाताई, अजितदादा यांच्यापैकी कोणाचीही निवडणूक असो, त्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गाव, वाडी, वस्ती पालथी घातली. सामाजिक कार्याच्या वेगवेगळ्या उपक्रमातून त्यांचा स्वतःचा बारामती शहरासह तालुक्यातील गावागावात थेट संपर्क निर्माण झाला होता. त्या संपर्काच्या बळावर त्यांनी या सर्वांच्या निवडणुकीत वेळोवेळी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.

नियती नावाची गोष्ट असते. पवार कुटुंबात दाखल झाल्यानंतर आणि सामाजिक क्षेत्रात सिद्ध केल्यानंतर ४० वर्षांनंतर त्या खासदार म्हणून संसदेत दाखल झाल्या. अर्थात त्या पदाची त्यांनी स्वतः कधीच अपेक्षा केली नव्हती, अगदी स्वप्नातही. पण काही जबाबदाऱ्या अचानकपणे पुढे ठाकतात. त्याला पर्याय राहत नाही. जबाबदारी स्वीकारली, की ती यशस्वीपणे पार पाडणे हा तर त्यांचा बाणा. त्यामुळे राज्यसभेत दाखल झाल्यानंतरही गेल्या वर्षभरात तिथेही त्यांनी चांगले काम करून दाखवले.

राज्यसभेत व्यापक हिताचे अनेक प्रश्न त्या मांडत आहेत. त्यातील काही प्रश्नांवर बोलण्याची संधी मिळताच मोठ्या आत्मविश्वासाने आणि तळमळीने त्या बोलत आहेत. त्यामध्ये अंगणवाडी सेविकांपासून मुळा-मुठा नदीच्या प्रदूषणापर्यंत, शिक्षणापासून रोजगारापर्यंत, ग्रामविकासापासून पुण्यासारख्या शहराच्या विकास आराखड्यापर्यंत अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला. सभागृहात उभं राहून त्यांनी मांडलेले विविध प्रश्न म्हणजे त्यांच्या आंतरिक तळमळीतून उमटलेला आणि जनतेचा उंचावलेला आवाज आहे. त्या आवाजाची दखलही घेतली जाते.

त्यांची खासदारकीची पहिलीच टर्म असूनही राज्यसभेच्या सभापती महोदयांनी सभागृहाच्या तालिका सभापतीपदी त्यांची निवड केली. त्यासाठी त्यांच्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरवत संधी मिळताच त्यांनी सभागृह यशस्वीपणे चालवले. सभागृहात सर्वांना समान संधी दिली. शिस्त राहील, गोंधळ होणार नाही याची दक्षता घेऊन या सर्वोच्च सभागृहाचे संचलन केले.

विविध संसदीय समित्यांवर झालेल्या निवडीचा उपयोग देखील संबंधित विषयांना न्याय देण्यासाठी कारणी लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
प्रत्येक विषयाची माहिती घेऊन, त्याचा अभ्यास करून विविध समित्यांवर त्या काम करत आहेत. त्यातून शिक्षण, महिला, बालक, युवक आणि क्रीडा विषयक समितीमध्ये सदस्य म्हणून कार्यरत राहताना कालबाह्य अभ्यासक्रम, शिक्षक प्रशिक्षणाचा अभाव, शैक्षणिक विषमता, डिजिटल दरी, वाचन साक्षरतेतील अडथळे आणि मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची घटणारी संख्या यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांकडे त्यांनी सभागृहाचे गांभीर्याने लक्ष वेधले. त्यासाठी त्यांना गावातील शैक्षणिक विकासात दिलेल्या योगदानासह विद्या प्रतिष्ठानच्या कामातील अनुभव उपयोगी ठरला असावा.

महिला सक्षमीकरण समितीमध्ये महिलांबाबत होणारा हिंसाचार, महिलांचा विविध पातळीवर होणारा छळ, आर्थिक व सामाजिक भेदभाव, शिक्षण आरोग्य सेवा व राजकीय प्रतिनिधित्वाबाबत असणारी असमानता अशा अनेक मुद्यांवर त्यांनी आग्रही आणि ठाम भूमिका मांडली. महिला विषयक धोरण तयार करताना प्रामुख्याने विचारात घ्यावेत, त्यांना अग्रक्रम द्यावा, असा आग्रह त्यांनी धरला. त्यासाठी त्यांना बारामती तालुक्यात महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कामाचा अनुभव कामी आला असावा.

केंद्रीय वस्त्रोद्योग सल्लागार समितीमध्ये काम करताना या उद्योगातील अडचणी, त्यामध्ये करायच्या धोरणात्मक सुधारणा, कामगारांची सुरक्षा यावर भर देत निर्यात आणि रोजगार वाढीसाठी त्यांनी शिफारशी केल्या. या समितीमध्ये काम करण्यासाठी त्यांना बारामती हाय टेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष म्हणून करत असलेल्या कामाचा अनुभव उपयोगी आला असावा.

पर्यावरण व वने सल्लागार समितीमध्ये हवामान बदल, हरित ऊर्जा, जैवविविधता व शाश्वत विकास याबाबत ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा त्यांनी आग्रह धरला. त्यासाठी बारामती तालुक्यात पर्यावरण, जलसंधारण कामात गेली अनेक वर्षे करत असलेल्या प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.

मेक्सिको येथे संपन्न झालेल्या जगभरातील महिला खासदार परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करता आले ही गोष्ट त्यांनी स्वतःचा बहुमान मानला नाही तर जागतिक व्यासपीठावर महिलांचे प्रश्न मांडण्याची महत्त्वपूर्ण संधी मानली. जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करताना राजकारणात ऑफलाइन आणि ऑनलाइन पातळीवर महिलांबाबतच्या हिंसाचारावरील चर्चासत्रात देशाची भूमिका मांडत अनेक महत्त्वपूर्ण विषयांकडे त्यांनी जगाचे लक्ष वेधले. याबाबत भारतात असणारे कठोर कायदे, त्याची अंमलबजावणी आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबतचा ठाम दृष्टीकोन मांडला. अशा कोणत्याही हिंसेला भारत कधीच सहन करणार नाही. महिलांचा स्वाभिमान, सहभाग आणि हक्क याबाबत कदापि तडजोड केली जाणार नाही, हे त्यांनी ठणकावून सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेची फलश्रुती गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.० मुळे राज्यात जलसाठा क्षमता वाढ

राज्यातील जलसुरक्षा बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *