विधान परिषदेत विरोधकांनी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणावरून २७९ अन्वये प्रस्ताव दाखल करत त्यावर चर्चा सुरु केली. चर्चेनंतर विरोधकांच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे सभागृह नेते एकनाथ शिंदे यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. मात्र नागपूर हिंसाचार प्रकरणी उत्तर देता देता शिवसेना उबाठाचे अनिल परब यांनी फक्त हात वरून बोलण्याची परवानगी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे मागितली. परंतु त्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठावरील साचून राहिलेला राग व्यक्त करण्यास सुरुवात केली. तसेच मी तुमचा (शिवसेना) डाव पलटी केला असे सांगत ही हिम्मत तुमच्यात आहे का असा सवालही यावेळी केला.
औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरात विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चानंतर नागपूरात दगडफेकीची घटना घडली. जो व्यक्ती महाराष्ट्राचा घास घ्यायला आला, तो आक्रमणकारी असताना त्याच्याबद्दल इतकी भूमिका असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी उपस्थित करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कारण नसताना देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली. सपकाळ यांचा काय छळ काय देवेंद्र फडणवीस यांनी केला, त्यांची सालट सोलून काढली का, त्यांचे डोळे काढले का, त्यांच्या जखमांवर मीठ चोळले का, त्यांच्या हाताची नखं उपसून काढली का असा सवाल केला.
त्यावर विधान परिषदेत उपस्थित असलेले शिवसेना उबाठाचे गटनेते अनिल परब यांनी त्यावर काही बोलण्याची परवानगी मागण्यासाठी सभापती राम शिंदे यांच्याकडे पाहून हात वर केला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी अनिल परब यांना उद्देशून तुमचाही छळ केला का असा सवाल केला. त्यावर अनिल परब यांनी शिंदे यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले की, माझ्या छळाचा काय संबध, माझा मुद्दा कोठून येतो असे प्रतिसवाल केला.
परंतु सभापती राम शिंदे यांनी अनिल परब यांना बोलण्याची परवानगी दिली नाही. त्यावरून त्यावर काहीशी चिडलेले एकनाथ शिंदे म्हणाले की, मी ८० जागा लढविल्या, त्यापैकी ६० जागांवर विजय मिळविला. तुम्ही १०० जागा लढविल्या पण तुमच्या २० जागा निवडूण दिल्या. जनतेने तुमचा सुफडा साफ केला अशी टीका करत, अशी करण्याची हिंम्मत आहे का तुमच्यात असे करून दाखवा असे आव्हानही यावेळी शिवसेना उबाठा पक्षाच्या आमदाराना दिले.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्ही सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना सोडले, शिवसेनेच्या धनुष्यबाणालाही सोडले होते. पण मी जर धाडस केले नसते तर बाळासाहेबांचे विचार वाचविण्यासाठी धनुष्यबाण वाचविण्यासाठी ज्या काँग्रेसबरोबर जाऊन नका म्हणून बाळासाहेब सांगायचे त्या काँग्रेसबरोबर तुम्ही गेलात. मी जे काही केलं ते खुलं आम केल, मी काही लपून छपून गेलो नाही की तिथे जाऊन परत पलटी मारली नाही. तुम्हाला जेव्हा नोटीस आली त्यावेळी मला वाचवा वाचवा म्हणून तिकडे गेलात कुणा कुणाला भेटलात, कोणा कोणासमोर लोटांगण घातलात ते सगळं मला माहित आहेत. तुमच्या पक्षाचा प्रमुखही आता आपण युतीचं सरकार स्थापन करू असे सांगत मोदींसमोर लोटांगण घातल, आणि इथं आल्यावर पलटी मारली असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला. तसेच पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मी पाच वेळा तुमच्या पक्षाच्या प्रमुखाला सांगितलं होते, आपली हिंदूत्वाची युती कायम ठेवू या पण त्या सत्तेच्या खुर्चीत असे काय होते की, त्याचा मोह त्यांना पडला असा सवालही यावेळी केला.
त्यावर अनिल परब यांनीही एकनाथ शिंदे यांच्या विषयी काही वक्तव्य केले. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, अनिल परब मला तुमची सगळी अंडी पिल्ली मला माहित आहेत, पण मी कधी कमरेखाली वार करत नाही. त्यामुळे तुम्हीही नोटीस आला म्हणून मी तिकडे गेलो, अटकेच्या भीतीने मी भाजपासोबत गेलो असे म्हणू नका असे सांगत. तुम्हा सर्वांना माहित आहे मी कधी स्वतःहून कोणाला डिवचत नाही, पण मला कोणी डिवचलं तर मी त्याला सोडत नाही असा गर्भित इशाराही यावेळी दिला.
त्यावेळी सचिन अहिर आणि अंबादास दानवे यांनीही काही बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी सचिन भाऊ अहिर साहेब आणि अंबादास दानवे तुम्हाला सगळं माहित आहे. त्यामुळे तुम्ही शांत रहा अशी सूचना करत हा शेर का बच्चा हूँ, शेर की तरह काम करता हूँ असे सांगत माझ्या कृत्याची दखल ३३ देशांनी घेतली. कोण आहे एकनाथ शिंदे अशी विचारणा केली. मी तर बाळासाहेबांचा छोटासा कार्यकर्ता आनंद दिघे यांचा शिवसैनिक असल्याचे सांगत लांडग्याने वाघाचं कातडं पांघरल्याने कोणी वाघ होत नाही असा उपरोधिक टोलाही उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
शेवटी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, नागपूर हिंसाचार प्रकरणातील आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही असेही यावेळी सांगितले.
◻️LIVE 📍विधान भवन, मुंबई 🗓️18-03-2025 📹 राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ – विधानपरिषदेतून लाईव्ह https://t.co/8PrE9XoQ0s
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 18, 2025
Marathi e-Batmya