गोविंदानंद यांनी अविमुक्तेश्वरानंद यांच्या विरोधात तक्रार करताच सरकारने अतिथीचा दर्जा काढला बनावट शंकराचार्य आहेत अविमुक्तेश्वरानंद असल्याचा स्वामी गोविंदानंद यांचा आरोप

ज्योतिर्मठ बद्रिकाश्रम आणि द्वारका शारदा पीठ येथील ब्रह्मलीन जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांचे शिष्य स्वामी गोविंदानंद सरस्वती महाराज यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर स्वयंघोषित शंकराचार्य असल्याचा आरोप केला असून, अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, हा वाद समोर आल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना दिलेला ‘राज्य अतिथी’चा दर्जा रद्द केला आहे.

गुरुवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना, स्वामी गोविंदानंद सरस्वती महाराज यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत आणि इतर पुरावे सादर केले. ते म्हणाले की, “३० ऑक्टोबर २०२० रोजी दाखल केलेल्या आमच्या याचिकेवर, १७ ऑक्टोबर २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती बीव्ही नागरत्ना यांनी स्पष्टपणे सांगितले की, निर्णय येईपर्यंत अविमुक्तेश्वरानंद किंवा इतर कोणीही स्वतःला वादग्रस्त पीठाचे शंकराचार्य घोषित करू शकत नाही. अशा प्रकारे स्वतःला शंकराचार्य घोषित करून, अविमुक्तेश्वरानंद केवळ सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करत नाहीत, तर ते सनातनी लोकांनाही दिशाभूल करत आहेत.”

स्वामी गोविंदानंद सरस्वती महाराज म्हणाले की, “याची माहिती कदाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नसावी, म्हणूनच ते त्यांच्या सेवेत उपस्थित झाले. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली होती. त्यावर सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अविमुक्तेश्वरानंद यांना दिलेला राज्य अतिथीचा दर्जा आणि त्यांचा प्रोटोकॉल रद्द केला आहे.

” स्वामी गोविंदानंद सरस्वती महाराज यांनी असाही आरोप केला की, “श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे ‘गो प्रतिष्ठा यज्ञ’ मध्ये ३३ कोटी आहुती देण्यासाठी यजमानांकडून प्रति आहुती ११ रुपये घेत आहेत. अशा प्रकारे, श्रद्धेच्या नावावर ते भोळ्या-भाबड्या भाविकांकडून ३६३ कोटी रुपये उकळण्याची योजना आखत आहेत. न्यायालय, भक्त, समाज आणि प्रशासनाची फसवणूक करणारे तसेच अनेक असामाजिक आणि गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आरोपी असलेले अविमुक्तेश्वरानंद सरस्वती, सदानंद सरस्वती आणि विधुशेखर भारती (शृंगेरी, कर्नाटक) हे बनावट शंकराचार्य आहेत.” अशीही माहिती स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी दिली.

About Editor

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा सल्ला, ‘उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’ रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *