मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे. विधानसभा निवडणुकीनंतर या चुकीच्या याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तशाच वापरल्या जाणार असतील तर मोठा घोळ होऊ शकतो. ताबडतोब या याद्या तपासा आणि दुरुस्त करा. दुरुस्त झालेल्या मतदार यादीवरच पुढील निवडणूक घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्याकडे केली.
आज सर्व विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांना मतदार यादीतील अनंत चुका दाखविल्या तद्नंतर त्यासंबंधीचा सविस्तर वृतांत पत्रकारांना दिला.
या बैठकीत जयंत पाटील यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकत पुढे म्हणाले की, मतदारांचे पत्ते चुकीचे आहेत. काही मतदार नोंद असलेल्या पत्त्यावर राहत नाही. घर क्रमांक चुकीचे आहेत. बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवले गेले आहेत. नाशिक मध्ये एकच घरात ८१३ मतदारांची नोंद आढळली. नालासोपारा मतदारसंघातील सुषमा गुप्ता या महिलेचे नाव ६ वेळ वेगवेगळ्या एपिक आयडी EPIC ID सह असल्याचे १२ ऑगस्ट रोजी विविध न्यूज चॅनलच्या बातम्यांमध्ये पुराव्यासह प्रसिद्ध केले गेले. त्यानंतर ते नाव हटवले गेले. हे नाव कोणी हटवले? असा सवालही यावेळी उपस्थित केला.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, याबाबतचा सवाल आयोगाला विचारला. आमचा असा समज झाला आहे की, राज्य किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर महाराष्ट्रात दुसरा कुणीतरी चालवतो असा गंभीर आरोप केला.
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, किती पुरुषांनी आणि किती महिलांनी मतदान केलं या याद्या दर तासाला जाहीर होतात. पण विधानसभेला ही सिस्टीम मोडण्यात आली. कोणी किती मतदान केलं हे संध्याकाळी पाच नंतर जाहीर करण्यात आलंच नाही. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फायनल यादी जाहीर करण्यात आली. हे पारदर्शक प्रक्रियेच्या विरोधात आहे. एका आमदाराने जाहीरपणे सांगितले की, २० हजार मते बाहेरून आणली. त्यामुळे माझा विजय झाला. या वक्तव्याची निवडणूक आयोगाने गंभीरपणे दखल घ्यावी अशी मागणीही यावेळी केली.
शेवटी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मतदान यादीत सोयीनुसार बदल होत आहेत, याची तक्रार आम्ही निवडणुकीच्या महिनाभरापूर्वी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. लोकशाहीची ही थट्टा आम्ही खपवून घेणार नाही. महत्वाचे म्हणजे आमच्या सर्व प्रश्नांचे आणि शंकांचे निरसन निवडणूक आयोगाने करावे. त्यावर भारतीय जनता पक्षाने व्यक्त होणं आम्हाला अभिप्रेत नाही असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला भाजपाला लगावला.
शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खा. अरविंद सावंत, बाळा नांदगावकर, शेकापचे नेते भाई जयंतराव पाटील, सपाचे नेते रईस शेख आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते.
Marathi e-Batmya