नाणार प्रकल्पावरून विधानसभेत तिसऱ्या दिवशीही गोंधळ सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नागपूर : प्रतिनिधी

मागील दोन दिवसांपासून कोकणातील नाणार प्रकल्पावरून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून सातत्याने विधानसभेत विरोध करण्यात येत आहे. या प्रश्नी आज शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका जाहीर न केल्याने शिवसेनेसह सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

याच मुद्द्यावरून सुरुवातीला सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब झाले. त्यानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सदस्य अध्यक्षासमोरील मोकळ्या जागेत एकत्र येत नाणार रद्द झालाच पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणी करत मोठमोठ्याने घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. या गोंधळातच सत्ताधारी पक्षाकडून काही विधेयके मंजूर करण्यात आली आणि त्यानंतर सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

त्यानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर शिवसेनेचे सुनिल प्रभू यांनी नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असून मुख्यमंत्र्यांनी जमिन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करावी आणि नाणारचा प्रकल्पही रद्द करावी अशी मागणी केली.

त्यावर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणी केली.

दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व आमदार अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत एकत्र येत घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे अखेर तालिका अध्यक्ष सुधाकर देसमुख यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

About Rajesh Salgaonkar

Check Also

शेतकरीविरोधी भाजपा सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसची ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली मानेगाव ते जळगाव जामोद पदयात्रा

केंद्रातील व राज्यातील भाजपा महायुतीच्या मागील १२ वर्षांच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमालाला भाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *