मुंबईः प्रतिनिधी
राज्यात भाजपा-शिवसेनेला रोखण्यासाठी ऐन निवडणूकीत लाव रे तो व्हीडीओ फँक्टर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आणला. तसेच मोदी-शाह यांना सोडून कोणालाही मतदान करण्याचे आवाहन केले. परंतु दुपारपर्यंत निवडणूकीचे निकाल पाहता मनसेचा अरे लाव तो व्हीडीओचा प्रभाव काही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करत नसल्याचे चित्र निकालात पाह्यला मिळत आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात १० ठिकाणी भाजपच्या विरोधात १० ठिकाणी जाहीर सभा घेतली. तसेच या सभेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या राजकीय भूमिकांवर मोठ्या प्रमाणावर टीका केली. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या जाहीरातींची पोल-खोल केली. त्यामुळे राज्यासह देशातही राज ठाकरे यांच्या सभांची दखल घेण्यात आली. तसेच राज्यात त्यांच्या नव्या पध्दतीची हवा ही निर्माण झाली.
याशिवाय मनसेचे कार्यकर्त्यांनी उघडपणे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारास सुरुवात केल्याने त्याचा निश्चित फायदा होईल अशी अटकळ बांधण्यात येत होती.
परंतु निवडणूकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली. तसे काँग्रेसच्या कोणत्याही उमेदवाराला विशेषतः सोलापूरातील सुशिलकुमार शिंदे, औरंगाबादचे सुभाष झांबड, नाशिकचे समीर भुजबळ यांच्यासारख्या मातब्बर उमेदवारांना पराभवाच्या छायेत आल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे राज्यातील एकाही जागेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नसला तरी आतापर्यंत जाहीर झालेल्या मतांच्या आकडेवरून लाव रे तो व्हीडीओ कुठेच चालला नसल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे.
Marathi e-Batmya