नाना पटोले यांची टीका, मतदान चोर सरकारचा निषेध म्हणून सदस्यत्वाची शपथ न घेण्याचा मविआचा निर्णय बॅलेट पेपरवर मतदान ही मारकडवाडीत पडलेली ठिणगी देशभरात पोहचवण्याचा काँग्रेसचा संकल्प

विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपा युतीचे सरकार आले असले तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेले नाही अशीच भावना जनतेला वाटत आहे. जनतेच्या मतांचे हे सरकार नाही. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीतील विधानसभा सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

विधानसभा परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी महाविकास आघाडीचे नेते भेट घेऊन पुढील रणनिती ठरवतील. भाजपा युतीचे सरकार हे जनतेचे सरकार नाही. मतांची चोरी करून आलेल्या सरकारने आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्यावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली. तरुण मुले व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. नागपूर भागात ७७३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. पण भाजपा युतीला त्याचे काही देणेघेणे नाही त्यांनी सरकारचा शपथविधी सोहळा धुमधडाक्यात घेतला असल्याची आरोप केला.

मारकरवाडीची लढाई…

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, लोकशाही व मताचा अधिकार वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. मारकडवाडीतून जी ठिणगी पेटलेली आहे, ती देशात पोहचवण्याचा काँग्रेसचा संकल्प आहे. यासंदर्भात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली असून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या आंदोलनावर दिल्लीत तयारी सुरु आहे. सर्व तयारी झाल्यानंतर मारकडवाडीचे आंदोलन देशव्यापी करण्यासंदर्भात निर्णय होईल असेही यावेळी सांगितले.

आयकर विभागाने जप्त केलेली अजित पवारांची १ हजार कोटींची संपत्ती परत देण्याच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, ना खाऊंगा, ना खाने दुंगा ही भूमिका नरेंद्र मोदींच्या लोकांसाठी नाही. भाजपाबरोबर असलेल्या नेत्यांच्या भ्रष्ट कारभारावर पांघरूण घालण्याचा हा प्रयत्न असल्याची टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक ‘महाराष्ट्र ज्ञान सभा-२०२६’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

वैश्विक ज्ञानाचे भारतीयीकरण व भारतीय ज्ञानाचे वैश्विकरण करणे, हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *