मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश, नदीजोड प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करा कोकण-गोदावरीसह चार महत्त्वाच्या योजनांचा आढावा

राज्यातील महत्वाच्या नदीजोड प्रकल्पांची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. कोकण-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी तसेच कोकण-गोदावरी वळण योजना या नदीजोड प्रकल्पांचा सविस्तर आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला.

मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेताना मंत्री विखे पाटील यांनी कामांची गती वाढवून प्रत्येक टप्प्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरविण्याचे निर्देश दिले. राज्याच्या दीर्घकालीन जलव्यवस्थापनासाठी तसेच दुष्काळग्रस्त भागांना दिलासा देण्यासाठी हे प्रकल्प अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात प्रस्तावित हा प्रकल्प दमणगंगा आणि वैतरणा उपखोऱ्यातील अतिरिक्त उपलब्ध पाणी उर्ध्व गोदावरी उपखोऱ्यात वळविण्यासाठी राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील अवर्षणप्रवण सिन्नर तालुक्यास सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असून घरगुती वापरासाठी, तसेच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडोरसाठीही पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच गोदावरी नदीत पाणी सोडल्यामुळे मराठवाड्यातील प्रकल्पाच्या लाभक्षेत्रालाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, प्रकल्पांतर्गत निलमाती, मेट, कोशिमशेत, उधळे आणि बोरखिंड अशी पाच धरणे प्रस्तावित आहेत. यापैकी उधळे आणि मेट धरणांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून कोशिमशेत, निलमाती आणि बोरखिंड धरणांच्या मोजणीची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. ही सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

बैठकीसाठी ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह यवतमाळचे जिल्हाधिकारी, पालघर येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी तसेच वन विभागाचे अधिकारी आणि संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीने उपस्थित होते.

About Editor

Check Also

राज ठाकरे यांचा सवाल, याला जबाबदार कोण? निवडणूक आयोगाकडून मतचोरी आणि भाजपाला मदत होईल अशा कामकाजावरून केला सवाल

इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्राच्या कालच्या मुख्य पानावरच्या या मथळ्याखालच्या ’14 times in 10 months, two Election …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *