नाना पटोले यांचा टोला, ७० दिवसानंतर खरी मॅच सुरु होईल तेंव्हा… कॅच घेईल राज्यातील पोलीसही असुरक्षित, गृहमंत्र्यांच्या फक्त घोषणा, कृती मात्र शून्य

शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना मुंबई पोलिसांनी त्यांना क्लिन चीट देणे म्हणजे भाजपाच्या वॉशिंगमशीन मधून वायकरांना स्वच्छ केल्याचे आणखी एक प्रकरण आहे. मोदी सरकार हे ईडी व सीबीआय या दोन कार्यकर्त्यांच्या मार्फत राजकारण कसे करते हे देशाने पाहिले आहे. अशी एखादी घटना समजू शकतो पण अनेक उदाहरणे आहेत, वायकर त्यातील एक प्रकरण आहे. नरेंद्र मोदी हे देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, वायकर प्रकरणावर फारसे बोलण्यात काही अर्थ नाही. लोकसभा निवडणुकीआधी पक्ष बदलून ते सत्ताधारी पक्षाबरोबर गेले तेव्हाच त्यांनी सांगितले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांना क्लिन चिट देऊन फाईल बंद केली यात नवल वाटण्यासारखे काही नाही, असेही यावेळी सांगितले.

पुण्यात महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटनेवर संताप व्यक्त करत नाना पटोले म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था कुठे राहिली आहे? महाराष्ट्र पोलिसच सुरक्षित नाहीत ही परिस्थिती आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त घोषणा करतात कृती मात्र काहीच नाही. जेलमधील आरोपींना व्हीआयपी ट्रिटमेंट मिळते, ससून रुग्णालयात उपचाराच्यानावाखाली आरोपींना फाईव्हस्टार व्यवस्था दिली जाते. प्रशासन व पोलीस कुठे आहे हे कळत नाही. नागपूरमध्येही राम झुलावर मद्यधुंद कारचालकाने दोन मुलांना कारखाली चिरडून मारण्याची घटना झाली, ती केस कमजोर करण्यासाठी पोलिसांवर दबाब होता. त्यामुळे या आरोपींना लागलीच जामीन मिळाला. धनदांडग्या घरातील आरोपींना कसलीच भिती राहिली नाही म्हणूनच महिला पोलिसाला जाळण्याची हिम्मत होते अशी खोचक टीकाही यावेळी केली.

दोन वर्षापूर्वी आम्हीही विकेट काढली होती या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, ७० दिवसानंतर खरी मॅच सुरु होणार आहे, दोन वर्षापूर्वी जे झाले तो लपवाछपवीचा, खोक्यांचा खेळ होता. आता खरा सामना जनतेच्या दरबारात होणार आहे. जनतेची काळजी नसलेले मुख्यमंत्री आहेत, सरकारच अदानीसाठी काम करत असून आता जनताच खोके सरकारची कॅच घेणार असून या मॅचनंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे हिट विकेट होणार आहेत, असा टोलाही लगावला.

शेवटी बोलताना नाना पटोले म्हणाले की, दिक्षाभूमीशी कोट्यवधी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. सरकार काही बांधकाम करत असेल आणि आस्था व जनभावनेला धक्का लागत असेल तर विरोध होणारच. जनभावना व आस्था यांचा ताळमेळ ठेवून काम करावे, पण सरकार आस्था व जनभावनेला किंमत देत नाही. संसद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे पुतळे या सरकारने हटवून एका कोप-यात बसवले. हे सरकार दिशाभूमीत काही चांगले करेल यावर लोकांचा विश्वासच म्हणून तो जनप्रक्षोभ आपल्याला दिसून आला. मन की बात करणारे सरकार असल्याने जनतेच्या श्रद्धा, जनभावनेला कुठलीची किंमत नाही. दिक्षाभूमीवर परवा जी घटना घडली हा त्याचाच परिपाक आहे, भाजपची कार्यपद्धती ‘मुंह मे राम दिल मे नथुराम’ हीच आहे अशी टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *