उध्दव ठाकरे यांनी दिला इशारा, विधानसभा अध्यक्षांनी उलट-सुलट केलं तर… पोपट मेला असल्याचे जाहिर करण्याचे काम विधानसभाध्यक्षांकडे

सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे सत्ताधारी पक्षांकडून त्यांच्या बाजूने हा निकाल लागल्याचं म्हटलं जात आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडूनही हा निकाल त्यांच्या बाजूने लागल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली. तसेच, त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही योग्य तो निर्णय घेण्याचा इशाराच दिला.

उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना सर्वोच्च न्यायालयासमोरील सुनावणीवर बोलताना म्हणाले, काल न्यायालयाने त्यांच्यासमोर जो पोपट ठेवलाय, तो हलत नाही, डोळे उघडत नाही वगैरे सांगून तो मेलाय हे जाहीर करण्याचं काम फक्त विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलंय. विधानसभा अध्यक्ष आधी आमच्याकडचे होते. आता भाजपाचे आहे. त्यांना राजकीय प्रवासाची माहिती आहे. तो प्रवास कायद्याच्या चौकटीत राहून कसा करायचा हे चांगलं कळतं. संपूर्ण जगात महाराष्ट्राची अवहेलना चालली आहे. महाराष्ट्राची बदनामी थांबली पाहिजे असे आवाहन केले.

पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, काल जे घडलं, त्यावर अनेकजण त्यांच्या चष्म्यातून बघू शकतात. मेलेला पोपट हातात घेऊन मागून मिठूमिठू करणारी लोकं आहेत. तात्पुरतं जीवदान मिळालं आहे. माझ्याप्रमाणेच नैतिकतेला जागून या बेकायदेशीर सरकारने राजीनामा द्यायला हवा. न्यायालयाने सगळी लक्तरं वेशीला टांगल्यानंतर आपण सगळे निवडणुकीला सामोरे जाऊ या. लोकशाहीत शेवटचं न्यायालय जनतेचं असतं. आपण जनतेच्या न्यायालयात जायला काय हरकत आहे? आपण जनतेचा कौल स्वीकारू, असा सूचक इशाराही दिला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, अध्यक्ष त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतीलच. त्यांनी उलट-सुलट काही केलं तर ज्याप्रमाणे आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत, त्याचप्रमाणे जर इथे काही वेडंवाकडं झालं तर पुन्हा आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. त्यानंतर जी काही बदनामी होईल, तेव्हा मात्र यांना जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाहीत. आज तर विधानसभा अध्यक्ष परदेशात आहेत. त्यांनी लवकरात लवकर यावं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे निर्णय घ्यावा, अशा स्पष्ट शब्दांत विधानसभा अध्यक्षांना इशारा दिला.

About Editor

Check Also

आकाश फुंडकर यांची माहिती, स्थानिक माथाडी भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य द्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन आस्थापनेत माथाडी कामगारांना काम

राज्यात कुठल्याही आस्थापनेत माथाडी कामगारांची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *