पीएम किसान सन्मान निधी आणि नमो महासन्मान हप्ता एकाच दिवशी योजनांच्या निधीचे ५ ऑक्टोबरला वितरण-कृषी मंत्री धनंजय मुंडे

लोकसभा निवडणूकीप्रमाणेच राज्यातील विधानसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत शेतकऱ्यांना खुष करण्यासाठी आणि अप्रत्यक्ष केंद्र सरकारने दिलेल्या योजनेचा फायदा देत असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी पी.एम. किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे माहे ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीतील अनुक्रमे १८ वा व पाचवा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार ०५ ऑक्टोबर, २०२४ रोजी सकाळी १०.०० वा. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता.मानोरा) येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे. या समारंभास राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ -वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

धनंजय मुंडे म्हणाले की, शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, २०१९ पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) रु. २०००/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. ६०००/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहेत. पी. एम. किसान योजने अंतर्गत दिनांक ३० सप्टेंबर, २०२४ अखेर राज्यातील जवळपास १.२० कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर एकूण १७ हप्त्यांमध्ये सुमारे रू. ३२००० कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

पी. एम. किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन २०२३-२४ पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पी. एम. किसान योजनेच्या १४ व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने २०२३-२४ व २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये एकूण ९१.४५ लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रु. ६९४९.६८ कोटी लाभ अदा करण्यात आला आहे. जून २०२३ पासून आयोजित गावपातळीवरील विशेष मोहिमांद्वारे पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची २० लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांची संख्या आज रोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहे.

केंद्र शासनाच्या पी. एम. किसान योजनेच्या १८ व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बॅंक खाती आधार संलग्न केलेल्या व ईकेवायसी पूर्ण केलेल्या एकूण ९१.५२ लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात रू. १९०० कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ तर राज्याच्या योजनेमधून रू. २००० कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.

या समारंभामध्ये पी. एम. किसान योजने अंतर्गत रू. २०००/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत रू. २०००/ असा एकूण ४००० रुपये चा लाभ प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते राज्यातील सुमारे ९१.५२ लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट जमा होईल. पी. एम. किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात https://pmindiawebcast.nic.in या लिंकआधारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी मंत्री मुंडे यांनी केले आहे.

About Editor

Check Also

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती

महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *