प्रकाश आंबेडकर यांचा जरांगेंना सल्ला, मराठा आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत मांडा

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा ६ वा दिवस असून त्यांची प्रकृती अस्वस्थ होत आहे. तसेच डॉक्टरांकडून उपचार घेण्यासही नकार दिला आहे. त्यातच राज्यात ओबीसी विरूध्द मराठा असे चित्र सध्या सामाजिक आणि राजकिय स्तरावर दिसू लागले आहे. यापार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांना उपोषण आता थांबवावे आणि लोकसभा निवडणूक लढवावी असा सल्ला देत मराठा आरक्षणाचे प्रश्न लोकसभेत मांडण्याचे आवाहनही यावेळी केले.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, मराठा समाजात ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे आंदोलन चार ते पाच वेळा केले. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाबत हवी असलेली जनजागृती आता झालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उपोषणाचे आंदोलन पुकारत स्वतःच्या शरीराला त्रास देणे चुकीचे ठरेल. त्यामुळे जरांगे पाटील यांनी आता लोकसभेची निवडणूक लढवावी असे आवाहनही केले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे यांनी प्रस्थापित पक्षात प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढवू नये. तर अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवावी असे सांगत पक्षाची उमेदवारी घेतली की मग त्या पक्षाची बंधने आणि नियमांचे बंधन येईल, त्यामुळे जरांगे पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवावी. जर त्यांनी आपली उमेदवारी जाहिर केली. तर मनोज जरांगे पाटील यांना वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देईल असेही जाहिर केले.

याशिवाय महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या झालेल्या दोन बैठकांमध्ये जवळपास ४० जागांवर निर्णय झालेला आहे. ८ जागांवर निर्णय होणे बाकी आहे. कालपर्यंत अशोक चव्हाण हे काँग्रेसच्यावतीने महाविकास आघाडीच्या बैठकीत ही जागा ती जागा आम्हाला पाहिजे म्हणून चर्चा करत होते. पण आता ते भाजपावासी झालेले आहेत. त्यांच्या जाण्याचा कोणताही परिणाम महाविकास आघाडीवर होणार नाही असेही ठामपणे सांगितले.

About Editor

Check Also

आमदार रईस शेख यांचे बीएमसी आयुक्तांना पत्र, महापालिका शाळातील विद्यार्थ्यांची केशव सृष्टी येथे सहल नको केशवसृष्टीमध्ये विद्यार्थ्यांची सहल म्हणजे शिक्षणाचे भगवीकरण

बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित केशव सृष्टी (उत्तन- भाईंदर ) येथील प्रस्तावित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *