लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत आघाडी न झाल्याने वंचित बहुजन आघाडीला स्वतंत्र निवडणूक लढवावी लागली. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या समर्थकांनी वंचित बहुजन आघाडी पक्ष भाजपाची बी टीम असल्याची टीका केली. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स ट्विटरच्या माध्यमातून आज संताप व्यक्त करत मी भाजपाची बी टीम आहे का असा सवाल केला.
प्रकाश आंबेडकर आपला संताप व्यक्त करताना म्हणाले की, सोशल मीडियावर दररोज काँग्रेस समर्थक माझ्यावर आणि वंचित बहुजन आघाडीवर भाजपाची बी-टीम असल्याचा आरोप करतात. मी भाजपाची बी-टीम आहे का? मी त्याच प्रश्नांची वारंवार उत्तरे देऊन थकलो आहे. हा जातीय आरोप प्रत्येक भारतीय मुस्लिमाला विचारलेल्या प्रश्नासारखाच आहे. जसे की, तुम्ही दहशतवादाच्या विरोधात आहात का? भारत किंवा पाकिस्तान क्रिकेट सामन्यात तुम्ही कोणाला सपोर्ट करता? असे मतही यावेळी व्यक्त केले.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माझ्यावर भाजपाची बी-टीम असल्याचा आरोप करणाऱ्यांचा युक्तिवाद काय? ते म्हणतात की मी निवडणूक लढवतो म्हणून मी भाजपाची बी-टीम आहे. मला या लोकांना एकच सांगायचे आहे – मी निवडणूक का लढू नये? भारतात द्विपक्षीय व्यवस्था आहे का? काँग्रेस समर्थकांना द्विपक्षीय व्यवस्था हवी असेल, तर त्यांच्या जातीयवादी आणि हुकूमशाही धन्यांना लोकप्रतिनिधी कायदा, १९५० बदलायला सांगा असे ठणकावून सांगितले.
प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, दुसरा युक्तिवाद असा की, मी काँग्रेसवर टीका करतो, पण मी भाजपावर सर्वाधिक टीका करतो हे त्यांना दिसत नाही. मी भाजपाची बी-टीम आहे तर पैसा कुठे आहे? मी पुण्यात एका माफक २ बीएचके फ्लॅटमध्ये राहतो. वंचित बहुजन आघाडी आणि माझ्या वैयक्तिक मालमत्तेची माहिती सार्वजनिक डोमेनमध्ये आहे आणि ती कोणीही मिळवू शकते. भाजपाच्या ऑफर मी असंख्य वेळा नाकारल्याचे काळाने दाखवून दिले आहे. माझ्यावर भाजपाची बी-टीम असल्याचा आरोप करणाऱ्या नेत्यांनी आमच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात यावे. आमचे पार्टी ऑफिस तुमच्या भव्य आधुनिक बाथरूमपेक्षा लहान आहे. आमचा पक्ष सर्वसामान्यांकडून मिळणाऱ्या देणग्यांवर चालतो असा खुलासाही यावेळी केला.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, फुले-शाहू-आंबेडकर आपल्या हृदयात आणि विचारांत आहेत. माझ्यावर बी-टीम असल्याचा आरोप कशाच्या आधारावर करता? मी पुढे जाऊन विजयी व्हावे, असे काँग्रेसला वाटत नाही. मी कधीही भाजपासोबत जाणार नाही. मला एकटे जावे लागले आहे. कोणत्याही स्वतंत्र आंबेडकरी नेतृत्वाने पुढे जावे, विस्तारावे असे काँग्रेसला कधीच वाटत नाही असा आरोपही यावेळी केला.
काँग्रेसवर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, बाबासाहेबांचा काँग्रेसकडून दोनदा पराभव झाला – १९५२ च्या संसदीय निवडणुकीत बॉम्बे (उत्तर) आणि १९५४ च्या पोटनिवडणुकीत भंडारा लोकसभा मतदारसंघात. बाबासाहेबांच्या विरोधात इतकी विषारी आणि द्वेषपूर्ण मोहीम सुरू करण्यात आली की त्यांची प्रकृती सतत खालावत गेली आणि दोन वर्षांनी १९५६ मध्ये त्यांचे निधन झाल्याचे सांगत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूस अप्रत्यक्ष काँग्रेसला जबाबदार धरले. भाजपा आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे बहुजनांनी समजून घेण्याची गरज आहे. भाजपा आपला अजेंडा लपवत नाही आणि उघडपणे आपल्या फुटीरतावादी अजेंडाचा प्रचार करत आहे. काँग्रेस आपला खरा अजेंडा लपवते; ते हसतमुख बहुजनांना अडकवून त्यांचा गैरफायदा घेतात. बहुजन फसले की काँग्रेस आपले विषारी दात दाखवते अशी खोचक टीकाही यावेळी केली.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मला एक प्रश्न आहे – जर तुम्ही आम्हाला मतदान केले असते तर आम्ही संविधान वाचवण्यासाठी उभे राहिलो नसतो का? विचार करा! त्यांनी नव्हे तर संविधान वाचवण्यासाठी आम्ही लढा सुरू केला. त्यांना राज्यघटना वाचवायची असती तर त्यांनी प्रथमतः ते नष्ट केले नसते. संविधान वाचवण्याचे आणि दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम यांच्या हक्कांचे रक्षण करण्याचे काम महाराष्ट्रात आमच्यापेक्षा चांगले कोणी करू शकत नाही असा दावाही यावेळी केला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही कोणत्याही बॉसला उत्तरदायी नाही. आम्ही फक्त आमच्या लोकांना जबाबदार आहोत. आम्ही कोणत्याही बाहुल्याच्या तालावर नाचत नाही. आम्ही कोणाचे चमचे नाही. आम्ही स्वतंत्र आहोत आणि आमच्याकडे स्वतंत्र नेतृत्व असल्याचे सांगत माझे नाव प्रकाश आंबेडकर आहे. माझे आजोबा आपल्या देशाच्या संस्थापकांपैकी एक होते आणि त्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे लोकशाहीची मूलभूत तत्त्वे म्हणून स्थापित केली. मी आंबेडकरवादी आहे. मी माझे संपूर्ण आयुष्य वर्णद्वेष, भेदभाव आणि दडपशाहीने पीडित लोकांच्या राजकीय हक्कांसाठी लढण्यासाठी समर्पित केले आहे आणि निवडणुकीच्या निकालाची पर्वा न करता मी लढत राहीन असा निर्धारही यावेळी व्यक्त करत वचन दिले की मी परत येईन. वंचित बहुजन आघाडी परत येईल. आम्ही परत येऊ असेही आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये स्पष्ट केले.
आये दिन सोशल मीडिया पर Congress समर्थकों द्वारा मुझ पर और VBA पर BJP की B-टीम होने का आरोप लगाए जाते हैं।
क्या मैं BJP की B-टीम हूं? — मैं बार-बार एक ही सवाल का जवाब देते-देते थक गया हूं।
ये जातिवादी आरोप हर भारतीय मुसलमान से पूछे जाने वाले सवाल से बहुत मिलता-जुलता है — क्या… pic.twitter.com/RkFYp4s3rB
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 13, 2024
Marathi e-Batmya